
राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत मानांकित खेळाडूंचा लागतोय कस
जळगाव : जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत ३९२ मुले व १७७ मुलींचा सहभाग असून ४०० पेक्षा जास्त खेळाडू मानांकित आहेत. चौथ्या दिवसाच्या सहाव्या फेरीपर्यंत मानांकित खेळाडूंचा वर्चस्व कायम ठेवण्यासाठी कस लागत आहे. नवोदित बुद्धिबळ खेळाडूंनी आपल्या कौशल्यांमुळे मानांकित खेळाडूंना जेरीस आणले आहे.
पहिल्या ४० खेळाडूंमध्ये ४ गुणांसह वर्चस्वासाठी घौडदौड बघायला मिळत आहे. मुलांच्या गटात पाचव्या फेरीत १० खेळाडू आघाडीवर आहेत. पहिल्या टेबलवर महाराष्ट्राचा आरेन मेहता याला अद्वित अग्रवालने पराभवाचा धक्का दिला. दुसऱ्या टेबलवर अविरत चौहान याने महाराष्ट्राच्या क्षितीज प्रसाद याला ‘चेकमेट’ केले. तिसऱ्या टेबलवर राजस्थानच्या रिशान जैन याला दिल्लीच्या अरिहत कपिल याला नमविले. कर्नाटकच्या वेंकटानागा कार्तिक याला पांडुचेरी च्या राहुल राम क्रिष्णन ला हरवले. बिहारच्या देवांश केसरी याला पश्चिम बंगालच्या नरेंद्र अग्रवाल याने आपल्या कौशल्यानुसार धक्का दिला.
मुलींमध्ये सहाव्या फेरीपर्यंत समिता पुलगावन आघाडीवर
मुलींच्या गटात सहाव्या फेरीपर्यंत चांगलीच चुरस बघायला मिळत आहे. पाचव्या फेरीतील पहिल्या टेबलवर केरळची मानांकित खेळाडू दिनी बेजेस व तिरपुरा येथील आराध्या दास यांच्यातील सामना अटितटीचा होऊन बरोबरीत सुटला. दुसऱ्या टेबलवर तेलंगणाची समिता पुलगावन हिने तामिळनाडूची पुजाश्री हिला नमविले. तिसऱ्या टेबलवर तेलंगणाची अल्ला हिमा हिला झारखंडची दिशीता डे हिने नमवून वर्चस्व सिद्ध केले. सहाव्या फेरी पर्यंत समिता मुलींमध्ये पाच गुणांसह आघाडीवर होती.
कोलकाता येथील मुख्य पंच देवाशीष बरुआ यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडत आहे. त्यांच्या सोबत पंच म्हणून गुजरातचे प्रशांत रावल, प्रवीण ठाकरे (जळगाव), स्वप्नील बनसोड (नागपूर), मंगेश गंभीरे (नाशिक), संदेश नागरनाईक (मुंबई), शांतुल तापासे (सातारा), जुईली कुलकर्णी (पुणे), योगेश गावंडे (धुळे), नथ्थू सोमंवशी, अभिषेक जाधव (पाचोरा), अमरेश जोशी (छत्रपती संभाजीनगर), शिशीर इंदुरकर (नागपूर), यशवंत बापट (अहिल्यानगर), आकाश धनगर (जळगाव), भरत आमले (जळगाव), मिना यादव (बिहार), महादेव बोरे (धाराशिव) हे काम पाहात आहेत.
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सीईओ अंबिका अथांग जैन यांनी स्पर्धेच्या चौथ्या दिवशीच्या उद्घाटनाच्या पहिल्या सत्रात खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आयुष्यात प्रत्येक ठिकाणी सकारात्मक खेळ करा. विजय-पराभवाचा विचार न करता खेळ खेळताना आपले शंभर टक्के योगदान द्या. खेळाचा माध्यमातून आपला सर्वांगीण विकास साधा. महात्मा गांधीच्या ‘वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका’ या विचाराच्या आचारणातून तुम्ही आपल्या जीवनात बदल करा असे सांगितले. जैन हिल्स येथे असणाऱ्या गांधी तीर्थाबद्दल बोलताना अंबिका अथांग जैन यांनी खेळाडू आणि त्यांच्या पालकांना गांधी तीर्थाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन केले.
चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी जैन परिवारातील सदस्य शोभना जैन, कॅन्डेटमास्टर विनोद भागवत-नाशिक, देवाशीष बारुआ, स्वप्नील बनसोड, रवींद्र धर्माधिकारी उपस्थित होते. यावेळी विनोद भागवत यांनी बुद्धिबळ खेळाविषयी मार्गदर्शन केले.
अद्वित अग्रवालचा धक्कादायक पराभव
पहिल्या पटावर महाराष्ट्राचा अग्रमानांकित अद्वित अग्रवाल (२२५१) पांढऱ्या सोंगट्यांसह दिल्लीचा कॅन्डेटेट मास्टर अरित कपिल (२०५०) याच्याशी भिडला. सिसिलियन डिफेन्स हायपर एक्सेलिटर ट्रॅगनने चाली करत सुरवातीला पांढऱ्या सोंगट्यांच्या बाजूला खेळ झुकला होता. पुढे अरित याने काळा ‘उंट’ ए-६ ते एफ-१ तिरकस रेघेत आक्रमरित्या पुढे केला. आणि पांढऱ्याने आपला ए-१ वरील ‘हत्ती’ बलिदान करत काळ्या राजावर घणाघाती हल्ला चढविला. आपल्या ‘ह’ पट्टीवर सैनिकाला पुढे ढकलत काळ्या राजाची बाजू कमकूवत केली. पण काळ्याने आपला योग्य अशा बचावात्मक चालीतून हल्ला निष्प्रभ केला. विरूद्ध उंटाच्या आकर्षक डावाच्या मध्यभागात पांढऱ्याने आक्रमक चाली रचून ‘मिटींग अॅटॅक’ काळ्या राजाला मात करण्याची धमकी दिली. पण एफ-४ चाल चुकीची खेळल्यामुळे काळ्याला अभेद्य असा बचावाची आखणी करता आली. काळ्याने आपल्या राजाला पांढऱ्या भागात नेत ए-२ चाल जागेवरील सैनिक (प्यादा) मारल्यामुळे काळ्याकडे वजिराच्या बाजूला दोन सैनिकांची बढत मिळत विजयाच्या मार्ग सुकर करत धक्कादायक निकालाची नोंद केली.