
पुणे ः सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित आमदार विनायक निम्हण मेमोरियल खुल्या व विविध वयोगटातील एक दिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत प्रितिका नंदी, विहान शहा, श्लोक, अलौकिक सिन्हा यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
गोविंद गार्डन मंगल कार्यालय पाषाण या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत सातव्या फेरीत खुल्या गटात पहिल्या पटावरील लढतीत श्लोक शरणार्थीने शाश्वत गुप्ताला बरोबरीत रोखले व ६.५ गुणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. श्लोक याने सिसिलियन पद्धतीने आपल्या डावास सुरुवात केली व ४० चालीमध्ये शाश्वतला बरोबरीत रोखले. श्लोक हा सप महाविद्यालयात अकरावी इयत्तेत विज्ञान शाखेत शिकत आहे.
१५ वर्षांखालील गटात दुसऱ्या पटावरील लढतीत अलौकिक सिन्हाने शॉन सॅम्युएलचा पराभव करून ६.५ गुणांसह विजेतपदाचा मान पटकावला. अलौकिक हा ब्लूरीच शाळेत नववी इयत्तेत शिकत आहे. १२ वर्षाखालील गटात विहान गायथ्री याने ओम चितळेला बरोबरीत रोखले व ६.५ गुणांसह विजेतपद पटकावले. १० वर्षाखालील गटात विहान शहाने अन्वित गायकवाडला बरोबरीत रोखले व ६.५ गुणांसह विजेतेपद पटकावले. ८ वर्षाखालील गटात प्रितिका नंदी हिने विहान कांबळेचा पराभव करून ६.५ गुणांसह विजेतपदाला गवसणी घातली.
यावेळी सहभागी खेळाडूंना संबोधताना सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व माजी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले की, महाराष्ट्राच्या केवळ १९ वर्षीय दिव्या देशमुख हिने नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत महिलांचे जगज्जेतेपद पटकावले. तिचा आम्हाला अभिमान वाटतो. परंतु, असे विश्वविजेते घडविण्याची बुद्धिबळाची सुरुवात ही खऱ्या अर्थाने लहान वयापासूनच व्हावी लागते. म्हणूनच आम्ही अशा विविध गटातील स्पर्धा आयोजित करून बुद्धिबळाच्या विकासाला हातभार लावण्याचा प्रयत्न करीत आहोत. यासारख्या स्पर्धांमधून भविष्यात निश्चितच गुणवान बुद्धिबळपटू घडतील, असा आम्हाला विश्वास वाटतो.
यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू व प्रशिक्षक जयंत गोखले म्हणाले की, या स्पर्धेला शहरातून भरघोस प्रतिसाद लाभला असल्याने बुद्धिबळ खेळाचा प्रसार हा दिवसेंदिवस नक्कीच वाढत चालला आहे. या भागात ही स्पर्धा आयोजित केल्याने स्थानिक खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच मदत लाभणार आहे. सहभागी स्पर्धकांनी यांसारख्या स्पर्धेत अधिकाधिक सहभागी होऊन आपली गुणवत्ता सिद्ध करावी.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू व प्रशिक्षक जयंत गोखले, सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व माजी नगरसेवक सनी निम्हण, द लाईफ स्पोर्ट्सचे मालक गणेश निम्हण, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव राजेंद्र कोंडे, संजय केडगे, दीक्षा गडसिंग, नागनाथ हलकुडे आणि मुख्य पंच गुरुजीतसिंग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश वाघ यांनी केले, तर अमित मुरकुटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.