
१७ वर्षांखालील गटात पटकावला दुहेरी मुकुट
ठाणे (समीर परब) ः यूनिव्हर्सल हायस्कूल ठाणे या शाळेने सिसीएसई झोन-क खो-खो स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करत स्पर्धेवर आपली छाप सोडली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात शाळेच्या संघाने विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात देखील शाळेच्या संघाने अजिंक्यपद मिळवले. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात शाळेला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. या खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक आणि प्रख्यात खो-खो प्रशिक्षक अक्षय शिर्सेकर यांचे कुशल मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेतून यूनिव्हर्सल हायस्कूल, ठाणे येथील एकूण २१ विद्यार्थी झोन-कच्या वतीने प्रादेशिक खो-खो स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. ही शाळेसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. अक्षय शिर्सेकर यांना त्यांच्या उत्कृष्ट प्रशिक्षण कौशल्याबद्दल झोन-क संघाचे १४ वर्षांखालील मुली, १७ वर्षांखालील मुले आणि मुली यांच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिर्सेकर हे राज्यस्तरावरही नावाजलेले प्रशिक्षक असून, मागील वर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन खेळाडूंनी महाराष्ट्र संघात स्थान मिळवून राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले होते. खो-खो खेळातील हे यश शाळेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनाचे प्रतीक असून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि क्रीडामुल्यांमध्ये समतोल साधण्याची प्रेरणा देणारे आहे.