पहिला ‘छत्रपती शिवाजी महाराज महावारस पुरस्कार’ अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाला

  • By admin
  • August 6, 2025
  • 0
  • 216 Views
Spread the love

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान 

मुंबई ः मुंबई येथे आयोजित महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या एका भव्य समारंभात पहिला ‘छत्रपती शिवाजी महाराज महावारस पुरस्कार २०२५’ अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  महासंघाच्या वतीने महासंघाचे अध्यक्ष ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे, कार्याध्यक्ष हृषीकेश यादव आणि माधव फडके यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

या प्रसंगी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव. किरण कुलकर्णी, पुरातत्व विभाग संचालक तेजस गर्गे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडू येथील १ असे एकूण १२ किल्ले समाविष्ट होण्याच्या प्रक्रियेत अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने यासर्व किल्ल्यांचे टू द स्केल मॉडेल (प्रतिकृती) तयार केले. या १२ प्रतिकृतींपैकी २ प्रतिकृती सांगली येथे तर १० प्रतिकृती मुंबई येथे अत्यंत विक्रमी वेळेत म्हणजेच अडीच महिन्यात तयार करण्यात आल्या असून याकरिता महासंघाच्या सदस्यांनी प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन तिथल्या वास्तूंची मोजमाप घेतली व त्यानुसार त्यांचे छोट्या आकारातील प्रमाण ठरवण्यात आले. या प्रतिकृती मागील वर्षी दिल्ली येथे भारत मंडपममध्ये पार पडलेल्या सांस्कृतिक प्रदर्शनामध्ये प्रदर्शित केल्या गेल्या. यावेळी वेगवेगळ्या देशांमधील सदस्यांनी या प्रतिकृतींचे कौतुक केले. याच सोबत युनेस्कोचे आलेले शिष्टमंडळही अत्यंत प्रभावित झाले होते. महासंघाने अनेक किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम देखील राबविल्या. याबद्दल हा पहिला ‘छत्रपती शिवाजी महाराज महावारस पुरस्कार २०२५’ महासंघाला प्रदान करण्यात आला आहे.

सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व सन्मानार्थ तीन लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमी, दुर्ग प्रेमी गिर्यारोहक स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव या निमित्ताने झाला व हा पुरस्कार गडकोटांसाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या सर्व संस्था व दुर्ग प्रेमींचा आहे अशी भावना महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी व्यक्त केली.  याचसोबत या पुरस्कारामुळे या सर्व किल्ल्यांचे भविष्यकाळात आणखी चांगल्या प्रकारे जतन करणे व त्यांचे पावित्र्य राखणे ही जबाबदारी अजून अधिक वाढल्याचे महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष ह्रषीकेश यादव म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *