
राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा : मुलींच्या गटात सात खेळाडूंचे वर्चस्व
जळगाव : जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या सातव्या फेरीपर्यंत दिल्लीचा अरिहत कपिल याने सात गुणांसह आघाडी घेतली आहे.
अरिहत कपिल याने पहिल्या फेरीपासून आतापर्यंत सातपैकी सात सामने जिंकून मुलांच्या गटात अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. अरिहत कपिल याने महाराष्ट्राच्या अविरत चौहान याला धक्कादायक पद्धतीने नमविले. त्यामुळे त्याला आघाडी घेता आली. दुसऱ्या पटावर तेलंगणाचा इशान कंदी व पश्चिम बंगालचा नरेंद्र अग्रवाल यांच्यातील डाव बरोबरीत सुटला. महाराष्ट्राच्या अद्वित अग्रवाल आणि ओणीक्षूक मंडल याच्यामध्ये बरोबरीत सामना झाला.

मुलींच्या गटात सहा गुणांसह सात खेळाडूंचे वर्चस्व
३९२ मुले व १७७ मुलींचा सहभाग असलेल्या या स्पर्धेतील मुलींच्या गटात पहिल्या बुद्धिबळ पटावर दिवी बिजेस आणि जानकी एस डी यांच्यात चुरशीचा डाव झाला. हा अटीतटीचा सामना बरोबरीत संपला. झारखंडची दिशीता डे हिने आरध्या दास त्रिपुरा हिच्यासोबत डाव बरोबरीत सोडवला. महाराष्ट्राची क्रिषा जैन व भूमिका बांधले यांच्यात तिसऱ्या पटावर सामना रंगला त्यात क्रिषा जैनने बाजी मारली. सुमिता पुनगावन तेलंगणा हिने मान्या ड्रोलिया गुजरात हिला नमवून आपले वर्चस्व कायम ठेवले. महाराष्ट्राची प्रिशा घोलप हिने कर्नाटकची नक्षत्रा गोमूदवेली हिला नमविले. मुलींच्या गटात सहा गुणांसह सात खेळाडू आघाडीवर आहेत.
बुधवारी सकाळच्या सत्रात अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन यांनी सांगितले की, तुम्ही विविध ठिकाणांवरुन येथे आला आहात. खेळताना विजय आणि पराभवाचा विचार करु नका. खेळाचा पुरेपुरे आनंद घ्या. फक्त खेळताना आपले शंभर टक्के योगदान द्या असा खेळाडूंशी संवाद साधला. त्यानंतर पालकांशी व्यवस्थेविषयी चर्चा केली. राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेनिमित्त करण्यात आलेल्या व्यवस्थेविषयी पालकांनी समाधान व्यक्त करीत जैन हिल्सच्या निसर्गरम्य परिसराचे कौतुक केले. त्यानंतर पालकांनी अनुभूती स्कूलला देखील भेट दिली.
दुपारचे सत्र ऐश्वर्या रेड्डी यांच्या प्रमूख उपस्थितीत सुरू करण्यात आले, यावेळी बौद्धिक एकाग्रता वाढविण्यासाठी बुद्धिबळ खेळ खूप मोलाचा असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, नाशिकचे वरिष्ठ प्रशिक्षक सुनील शर्मा, पंच दीपक चौहान, पुण्याच्या जुईली कुलकर्णी, प्रवीण ठाकरे आदी उपस्थित होते.