
ऑक्टोबर महिन्यात वेस्ट इंडिज संघाशी सामना
मुंबई ः इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची रोमांचक कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवल्यानंतर भारतीय कसोटी संघ आता २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या पुढील टप्प्यासाठी सज्ज आहे. या मालिकेतून भारताने ६० पैकी २८ गुण मिळवले आहेत आणि सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे,
टीम इंडिया आपला पुढील कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे. ही दोन सामन्यांची घरची मालिका २ ऑक्टोबर २०२५ पासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू होईल. दुसरी कसोटी १० ऑक्टोबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. रोस्टन चेसच्या नेतृत्वाखालील विंडीज संघ भारतात आव्हान देईल.
नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेशी सामना
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या मालिकेत दक्षिण आफ्रिका संघ नोव्हेंबर २०२५ मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. त्यातील पहिला सामना १४ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे आणि दुसरा सामना २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर होईल.
भारत २०२६ मध्ये दोन परदेशी दौऱ्यावर जाईल
जुलै २०२६: भारत श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. शेवटच्या वेळी २०२२ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेचा २-० असा पराभव केला होता.
नोव्हेंबर २०२६: भारत नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर दोन कसोटी सामने खेळेल. गेल्या घरच्या मालिकेत, भारताला न्यूझीलंडविरुद्ध ०-३ असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, २०२० मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर भारताने दोन कसोटी सामने गमावले.
२०२७ च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा सामना
डब्ल्यूटीसी सायकलच्या शेवटी, भारत २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळेल. गेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघ १-३ असा पराभूत झाला होता, परंतु २०२३ मध्ये भारताने घरच्या मैदानावर मालिका २-१ अशी जिंकली.
डब्ल्यूटीसी २०२५-२७ मध्ये भारताची एकूण कसोटी मालिका
१. भारत विरुद्ध इंग्लंड – पूर्ण (२-२ अशी बरोबरी)
२. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज – ऑक्टोबर २०२५ (भारतात)
३. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – नोव्हेंबर २०२५ (भारतात)
४. भारत विरुद्ध श्रीलंका – जुलै २०२६ (श्रीलंकेत)
५. भारत विरुद्ध न्यूझीलंड – नोव्हेंबर २०२६ (न्यूझीलंडमध्ये)
६. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – फेब्रुवारी-मार्च २०२७ (भारतात)