
हिंगोली ः कळमनुरी येथील नावेद खान महेबूब खान पठाण यांची नुकतीच नागपूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
एका सामान्य कुटुंबातील जिद्दी व होतकर व खेळाडूने आपल्या खेळाची सुरुवात १९९९ पासून गुलाम नबी आझाद हायस्कूल कळमनुरी येथुन सुरुवात केली व नंतर बीए शाखेचे शिक्षण कळमनुरीच्या शंकरराव सातव कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. पुढील शिक्षण २०१५ मध्ये नागनाथ महाविद्यालय जवळा बाजार येथे बीपीएड करीत असताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कर्णधारपद भूषवले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एनपी स्पोर्ट फाउंडेशनची स्थापना केली आणि त्या माध्यमातून राज्यस्तरीय खेळाडू घडविण्याचे कार्य सुरू केले आणि ते आजही सुरू आहे.
हिंगोली जिल्ह्यात व्हॉलीबॉल खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ते अपार मेहनत घेत आहेत. त्यांची कार्याची दखल घेत नुकत्याच नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये त्यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्यामुळे हिंगोली जिल्ह्याला पहिल्यांदा एका क्रीडा प्रकारामध्ये मानाचा असा बहुमान मिळाला. या निवडीबद्दल त्यांचे हिंगोली जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अजय पाटील, उपाध्यक्ष विक्रम शिंदे, कल्याण देशमुख, आनंद अडकीने, संदीप कदम, कार्याध्यक्ष संजय ठाकरे, सहसचिव अतहर पठाण, रूपेश सुर्यवंशी, आवेज नाईक, राष्ट्रीय खेळाडू बादशाह खान, शेख खादर, शेख वहीद, मुन्ना नाईक, मजहर खान व क्रीडा प्रेमींकडून अभिनंदन करण्यात आले.