
मानद सचिव अरुण केदार यांनी अहवाल व कॅरम घड्याळ दिले भेट
मुंबई ः महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या पुढाकाराने कॅरमच्या प्रचार आणि विकासासाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शहा, सचिव अरुण केदार, अखिल भारतीय कॅरम महासंघ व आंतरराष्ट्रीय महासंघाचे माजी सचिव तसेच हरियाणा कॅरम असोसिएशनचे सचिव एस. के. शर्मा, चंदिगढ कॅरम असोसिएशनचे सचिव महेश सेखरी व सेंट्रल सिव्हिल स्पोर्ट्स बोर्ड दिल्लीचे विजेंदर सिंग यांनी दिल्ली येथे संसद भवन येथे केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. या भेटीत कॅरम खेळाच्या व खेळाडूंच्या विविध समस्या मांडण्यात आल्या.
यावर क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी यामध्ये लक्ष घालण्याचे व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. क्रीडा मंत्र्यांनी दाखवलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे कॅरम या खेळाचा आगामी मार्ग सुखकर होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

आगामी काळात स्पोर्ट्स गव्हर्नन्स बिलमध्ये महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने केलेल्या सूचनांचा विचार केल्याबद्दल महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने मानद सचिव अरुण केदार यांनी क्रीडा मंत्र्यांचे विशेष आभार मानले.
भविष्यात एशियन, कॉमन वेल्थ व ऑलिम्पिक सारख्या खेळात कॅरम या भारतीय खेळाचा समावेश झाल्यास भारताच्या पदकतालिकेत सहा सुवर्ण, चार रौप्य व दोन कांस्य पदकांची वाढ होऊ शकेल असे मानद सचिव अरुण केदार यांनी सांगितले. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष जितेंद्र शहा व मानद सचिव अरुण केदार यांनी क्रीडा मंत्र्यांना सन २०२४-२५ सालचा राज्य संघटनेचा अहवाल व कॅरमचे घड्याळ भेट म्हणून दिले.