
छत्रपती संभाजीनगर ः वाळूज परिसरातील दगडोंजीराव देशमूख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे एकदिवसीय भालाफेक कार्यशाळेचे आयोजन शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागामार्फत करण्यात आले होते. या कार्यशाळेला खेळाडूंचा मोठा प्रतिसाद लाभला.
यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थिनींना भालाफेक करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ भरतसिंग सलामपुरे यांनी दिले. तसेच २०२१ मध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्रा याने ८७.५८ मीटर अंतर भालाफेक करुन विश्व रेकॉर्ड बनवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राच्या ऐतिहासिक सुवर्ण यशाचा आनंद साजरा करताना ७ जुलै हा दिवस राष्ट्रीय भालाफेक दिवस म्हणून साजरा करावा असे घोषित केले होते.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले संत सावता माळी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ संदीप जंगताप यांनी विद्यार्थ्यांना खेळामुळे करिअर कसे घडू शकते. खेळ खेळण्याने शरीराचा विकास कसा होतो, खेळाचे फायदे अशी सखोल माहिती दिली. खेळामध्ये मिळणाऱ्या विविध पुरस्कारांची माहिती देऊन राष्ट्राविषयी प्रेम जागृत केले. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल माहिती सांगताना महाविद्यालयात हेल्थ अँड वेलनेस, योगा हे दोन विषयी अनिवार्य शासनाने केले असल्याचे लक्षात आणून दिले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राहुल हजारे आणि प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रोफेसर संजय सांभाळकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अनुजा कंधारकर यांनी केले. डॉ सीमादेवी मुंडे यांनी आभार मानले. या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.