
१५ ते १७ ऑगस्ट दरम्यान आयोजन, हेमेंद्र पटेल, तेजस्विनी सागर यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि एआयसीएफ यांच्या मान्यतेने शतरंज रायझिंग स्टार्सतर्फे येत्या १५ ते १७ ऑगस्ट या कालावधीत शहरात महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर (अंडर १५) ओपन आणि मुलींची फिडे रेटिंग बुद्धिबळ चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे प्रायोजकत्व दिग्विजय इंडस्ट्रीज (छत्रपती संभाजीनगर) यांनी स्वीकारले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल, वूमन इंटरनॅशनल मास्टर तेजस्विनी सागर, अंजली सागर यांनी या स्पर्धेच्या आयोजनाविषयी सखोल माहिती दिली. या पत्रकार परिषदेस उमेश जहागीरदार, अजय पटेल, विलास राजपूत, सिया सागर, मिथुन वाघमारे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य सबज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन बीड बायपास परिसरात वासंती मंगल कार्यालय (सातारा परिसर) या ठिकाणी करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून चार मुले व चार मुली असा संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेत २५० खेळाडू सहभागी होतील अशी माहिती यावेळी देण्यात आली.
ही स्पर्धा एमसीए, एआयसीएफ आणि फिडे यांच्या नियमानूसार घेण्यात येत आहे. या स्पर्धेतून राष्ट्रीय अंडर १५ बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय अंडर १५ बुद्धिबळ स्पर्धा खेळण्याची इच्छा असलेल्या खेळाडूला या राज्य स्पर्धेत सहभाग घेणे् क्रमप्राप्त आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्याच्या खेळाडूला एक हजार रुपये तर डोनर एन्ट्री भरणाऱ्या खेळाडूला दोन हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. या स्पर्धेत आपले नाव निश्चित करण्यासाठी १३ ऑगस्ट ही अखेरची तारीख आहे.
राज्य सब ज्युनियर निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धा वासंती मंगल कार्यालयात १५ ते १७ ऑगस्ट अशी तीन दिवस रंगणार आहे. १५ व १६ ऑगस्ट रोजी प्रत्येकी तीन राऊंड खेळवण्यात येणार आहेत. १७ ऑगस्ट रोजी दोन राऊंड होतील. त्यानंतर पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार आहे. या स्पर्धेत एकूण ८ राऊंड खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत मोबाईल फोन व घड्याळ अशी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खेळाडूंना डाव खेळताना बाळगता येणार नाहीत.
४८ हजार रुपयांची रोख पारितोषिके
या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ४८ हजार रुपयांची रोख पारितोषिके व आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे. पहिल्या अव्वल दहा खेळाडूंना पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेत चीफ आर्बिटर म्हणून दीप्ती शिदोरे कामकाज पाहणार आहेत. डेप्युटी चीफ आर्बिटर म्हणून विलास राजपूत असतील. टूर्नामेंट डायरेक्टर म्हणून तेजस्विनी सागर या काम पाहणार आहेत. या स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव हेमेंद्र पटेल (९३२५२२८२६१) व मिथुन वाघमारे (९९२३६९६४१७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.