
राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतून उद्याचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू घडणार : डॉ भावना जैन
जळगाव : जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत जोरदार चुरस निर्माण झाली आहे. स्पर्धेत शुक्रवारी शेवटची फेरी खेळली जाणार असून विजेतेपदासाठी खेळाडूंमध्ये अटीतटीच्या लढती सुरू आहेत. मुलांमध्ये दिल्लीचा अरिहत कपिल याने आठ गुण घेत आघाडी घेतली आहे. त्याला ७.५ गुणांसह महाराष्ट्राचा आर्यन मेहता, मनी सरबातो (पश्चिम बंगाल), वोनिश्चिक मंडल (पश्चिम बंगाल) लढत देत आहेत. मुलींमध्ये महाराष्ट्राची क्रिशा जैन हिने आघाडी घेतली आहे. तिच्यासमोर वंशिका (दिल्ली) आणि जानकी (केरळ) यांनी आव्हान उभे केले आहे.
मुलांच्या लढती अशा रंगल्या
जैन हिल्स येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ३९२ मुले आणि १७७ मुली सहभागी झाल्या आहेत. त्यांच्यात पहिल्या दिवसांपासून जोरदार लढती सुरु आहेत. स्पर्धेतील नववी फेरी रंगतदार झाली. आघाडीवर असलेल्या खेळाडूंचे सामने अनिर्णित राहिले. पश्चिम बंगालमधील मनी सरबातो आणि अरहित कपिल यांचा सामना बरोबरीत सुटला. यामुळे कपिल याचे आठ गुण झाले तर मनी सरबातो ७.५ गुणांवर आहे. महाराष्ट्राचा अद्वित अग्रवाल आणि पश्चिम बंगालचा अवरित चव्हाण यांच्यातील नवव्या फेरीतील सामना बरोबरीत राहिला.
कर्नाटकमधील अभिनव आनंद आणि महाराष्ट्रातील अविरत चौहान यांचा लढतीचाही निकाल लागला नाही. तो सामना बरोबरीत राहिला. परंतु महाराष्ट्राचा आर्यन मेहता याने तेलंगणातील नदोष शामल याचा पराभव करत स्पर्धेत चुरस कायम ठेवली. पॉडिचेरी येथील राहुल रामकृष्ण आणि गुजरातमधील विहान यांची लढत देखील बरोबरीत राहिली. पश्चिम बंगालमधील वोनिश्चिक मंडल याने धुव्र गुप्ता याचा पराभव केला.
मुलींच्या गटात महाराष्ट्रातील क्रिशासमोर आव्हान
मुलांप्रमाणे मुलींच्या गटात नवव्या फेरीअखेर चांगलीच चुरस आहे. महाराष्ट्रातील क्रिशा जैन हिने ८ गुण घेत विजेतेपदाकडे एक पाऊल पुढे टाकले आहे. क्रिशा हिने नवव्या फेरीत केरळमधील दिवी बिजेस हिला पराभूत केले. समीहा (तेलंगणा) आणि वंशिका रावल (दिल्ली) यांच्या लढतीत वंशिका विजयी झाली. तेलंगणातील अलाहिमा हिचा केरळमधील जानकी एस डी हिने अटीतटीच्या लढतीत पराभव केला. महाराष्ट्रातील क्रिशा ही ८ गुणांसह आघाडीवर आहे तर वंशिका आणि जानकी ७.५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
कौशल्य दाखवण्याचे सर्वोत्कृष्ट व्यासपीठ – डॉ भावना जैन
सकाळच्या सत्राचे उद्घाटन कांताई नेत्रालय प्रमुख डॉ भावना जैन यांनी बुद्धिबळाच्या पटावरील चाल खेळत केले. यावेळी खेळाडूंसोबत संवाद साधताना त्यांनी सांगितले की, देशभरातून आलेले सर्व खेळाडू जैन हिल्स येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तुमच्यातील काही जण उद्याचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू होणार आहेत. देशातील नामांकीत बुद्धिबळपटू तयार होणार आहे. त्यासाठी तुमच्यात असलेले कौशल्य दाखवण्याचे हे सर्वोत्कृष्ट व्यासपीठ तुम्हाला मिळाले आहे. त्याचा पुरेपुर लाभ घ्या, असे आवाहन डॉ भावना जैन यांनी केले. उद्घाटन प्रसंगी जळगाव बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, मुख्य पंच देवाशीष बरुआ उपस्थित होते. स्पर्धेसाठी अरविंद देशापांडे, प्रविण ठाकरे, रवींद्र धर्माधिकारी, संजय पाटील परिश्रम घेत आहेत.