
महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुख हिने जॉर्जियाच्या बटुमी येथे झालेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून भारताचा नावलौकीक वाढवला. नागपूरची दिव्या देशमुख १९व्या वर्षी महिला वर्ल्ड कप जिंकणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळ खेळाडू ठरली. दिव्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. दिव्या देशमुख, ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, प्रशिक्षक आणि डॉ जितेंद्र देशमुख, डॉ नम्रता देशमुख पालकांचे मनापासून अभिनंदन.
दिव्या देशमुख हिने वर्ल्ड कप विजेतेपद पटकावल्यानंतर तिने आपले विजेतेपद तिचे पूर्वीचे प्रशिक्षक कै. राहुल जोशी यांना समप्रित केले. त्यानंतर राहुल जोशी हे नाव चर्चेत आले. राहुल जोशी याला दिव्या ग्रँडमास्टर व्हावे असे सातत्याने वाटत असे आणि त्यांना दिव्या ग्रँडमास्टर होणार याचा विश्वास होता. आज दिव्या ग्रँडमास्टर झाली आणि वर्ल्ड चॅम्पियन देखील झाली. दिव्या देशमुखने तिचे ग्रँडमास्टर पद तिचे पहिले प्रशिक्षक राहुल जोशी यांना समर्पित करून त्या वचनाचे पालन केले. जगभरात चर्चा होण्यापूर्वी राहुल जोशी यांनी दिव्याच्या कौशल्यावर विश्वास ठेवला होता.
राहुल जोशी हे बुद्धिबळ क्षेत्रातील एक समर्प्रित व्यक्तीमत्त्व होते. प्रारंभी जालना आणि त्यानंतर नागपूर या ठिकाणी राहुल जोशी यांनी बुद्धिबळ प्रशिक्षण अकॅडमी सुरू केली. बुद्धिबळ प्रशिक्षक म्हणून जालना व नागपूर या दोन्ही ठिकाणी त्यांनी आपले नाव केले. १९७९ मध्ये जन्मलेले राहुल जोशी हे फिडे रेटेड खेळाडू होते (रेटिंग १७२१-१९२५ च्या आसपास शिखरावर होते) आणि २०१४ मध्ये त्यांनी फिडे प्रशिक्षक पदवी मिळवली.
राहुल जोशी हे जालना येथे संतोष शेळके, विजय गिनवडे, सतीश ठाकुर, विलास पवार, प्रकाश देशपांडे, तुषार वाणी व प्रसन्न भागवत यांच्या सोबत बुद्धिबळाचा सराव करणे, टूर्नामेंट घेणे याचबरोबर अक्षरशः तासंतास बुद्धिबळ खेळायचे. त्याकाळी लँडलाईन नंबर असायचे मोबाईल नव्हते.राहुल जोशी आणि संतोष शेळके आवर्जून मला फोन करायचे. संतोष शेळकेची साथ फार दिवस मिळाली नाही. औरंगाबादचे अमरीश जोशी, पुष्कर वैद्य, सचिन पुरी, श्याम तळेगावकर, विकास कुंभार व सचिन मोरे यांच्या मित्रत्वाच्या सहवासाखाली तयार झालेला बुद्धिबळ खेळाडू म्हणजे राहुल जोशी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा खेळाडू माझा मित्र अतुल रेंगे (परभणी) व मी स्वतः जळगाव येथे स्पर्धा खेळायला जात होतो. राज्यस्तरीय महावीर कोचिंग क्लासेस बुद्धिबळ स्पर्धेत आयोजित जळगाव येथे विनोद भागवत आणि राहुल जोशी मला म्हणायचे की दिनू ये विनोद आपने एरिया मे उसका राजा लाके अपने को मेट करता. अपने को विनोद से सीखना पडता. राहुलच्या या प्रेरणेने त्या स्पर्धेत विनोद भागवत प्रथम, अतुल रेंगे व मी स्वतः चौथा आणि सहावा क्रमांक प्राप्त केला. त्या स्पर्धेत २० आंतरराष्ट्रीय मानांकन खेळाडू होते. आम्ही बिगर मानांकित होतो. राहुल जोशी या पद्धतीने खेळाडूंना मोटिवेट करत असे. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त बुद्धिबळ स्पर्धेसाठी राहुल जोशी नांदेडला आवर्जून यायचा. सुमुख गायकवाड व पुष्कर वैद्य सोबत असताना राहुल मला डाव जिंकल्यावर दिनकरराव संभालो अपनी टोपी, कहीं हवा मे उड न जाये. लहान गटात प्रथम आलेला पवन कातकडे (परभणी) त्यावेळेस लहान होता. राहुल प्रेमाने मला माझ्या खेळाडूंसोबत असताना दिनू असे म्हणायचा.
चेन्नई येथे अंडर ५ माझा मुलगा सक्षम व अंश यांना स्कूल नॅशनलला स्पर्धेसाठी घेऊन गेलो असता राहुल सरांची दिव्याला शिकवण्याची कौशल्य शैली जवळून पाहण्यात आली व नागपूरला पण अधून-मधून मी व चंद्रशेखर पोटेकर (परभणी) भेट असायची. नांदेड येथे आल्यावर मला तो आवर्जून म्हणायचा नांदेडला शिफ्ट व्हायचा विचार कधी अधून-मधून मनात येतो. राहुल जोशी यांचे फोनवरती संभाषण शेवटच्या क्षणापर्यंत होते. जालना येथे मन रमत नसल्यामुळे नागपूरला शिफ्ट झाला होता.
नागपूरला अंकुश रक्ताडे यांच्या चांगल्या सपोर्टने व त्यांचे मित्र मंडळी सहकार्याने यांनी बुद्धिबळाची प्रशिक्षण सुरू केले. नागपूरमध्ये आनंद बुद्धिबळ अकादमीची स्थापना केली. राहुल नागपूरला शिफ्ट झाल्यावर अंकुश रक्ताडे, प्रवीण ठाकरे, भूषण श्रीवास, पवन कातकडे, यशवंत बापट, निळकंठ श्रावण, पवन डोडेजा, निनाद सराफ, आकाश ठाकूर, महाराज, उमेश पानबुडे यांच्या सहवासाने बुद्धिबळातील आदर्श प्रशिक्षक बनला. मित्रत्वाच्या नात्याने मला आवर्जून सांगावसं वाटतं की जीवनाची दुसरी इनिंग खेळते वेळेस तो कमी पडला आणि अल्पवयामध्येच आपल्याला तो सोडून गेला.
बुद्धिबळ खेळाडू व प्रशिक्षकाने जीवनाच्या सर्व पैलूंचा आनंद घ्यायला शिकले पाहिजे या अनुभवातून सांगावसं वाटतं. त्यांच्याकडे खूप लहान मुलांसोबत काम करण्याची विशेष कला होती. बुद्धिबळाच्या जागतिक यशोशिखरावर जाण्यासाठी बुद्धिबळपटूला अनेक प्रशिक्षकांची आवश्यकता असते. परंतु या मार्गावर घेऊन जाण्याचे बाळकडू देणारा बुद्धिबळ प्रशिक्षक म्हणजे राहुल जोशी. त्यांनी दिव्या आणि रौनक साधवानी दोघांनाही लहानपणीच प्रशिक्षण दिले, बुद्धिबळाच्या मूलभूत नियमांपासून सुरुवात केली.
दिव्या देशमुख यांचे प्रशिक्षण
दिव्याने राहुल जोशींसोबत औपचारिक बुद्धिबळ प्रशिक्षण वयाच्या चार वर्षांच्या आसपास सुरू केले. राहुल जोशीने दिव्या देशमुखच्या सुरुवातीच्या विकासाला आकार दिला. बुद्धिबळाचा सराव आणि शिस्तबद्ध सवयी लावणे, तिला लवकर स्पर्धात्मक स्पर्धांमध्ये मार्गदर्शन करणे, संयम आणि आक्रमकता या दोन्ही गोष्टींना प्रोत्साहन देणे – ज्याचे श्रेय दिव्या देशमुखने नंतर जाहीरपणे राहुल सराना दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्याने वयाच्या ७ व्या वर्षी राष्ट्रीय अंडर ९ जेतेपद आणि त्याच काळात आशियाई अंडर ७ अजिंक्यपद जिंकले.
राहुल जोशी यांचे २४ एप्रिल २०२० रोजी वयाच्या ४० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने विशेषतः महाराष्ट्र बुद्धिबळ समुदायात मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त करण्यात आला. जुलै २०२५ मध्ये जेव्हा दिव्या देशमुखने फिडे महिला विश्वचषक जिंकला, तेव्हा तिने तिचा विजय तिच्या पहिल्या प्रशिक्षकाला समर्पित केला, तिच्या आवडीला प्रज्वलित करण्यात आणि तिच्या बुद्धिबळाचा पाया रचण्यात त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची कबुली दिली. त्या पायाभूत कामाने तिला विश्वविजेता बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण केले. दिव्याचा अलीकडील विजय आणि तिच्या पहिल्या प्रशिक्षकाचा उल्लेख प्रसिद्धी माध्यमांमध्ये वाचून फार आनंद झाला.

- डॉ. दिनकर हंबर्डे,
सचिव, नांदेड जिल्हा बुद्धिबळ संघटना.