
झलक भाट, याशिका गोयल, समृद्धी चव्हाण यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
शिरपूर ः श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई, संचलित तांडे शिरपूर येथील मुकेश आर पटेल निवासी सीबीएसई शाळेच्या खेळाडूंनी सीबीएसई दक्षिण विभाग – २ बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
सदर स्पर्धा भंडारा येथील एमडीएन फ्युचर स्कूल येथे आयोजित करण्यात आली होती. सीबीएसईद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या क्लस्टर सामन्यांत महाराष्ट्र, केरळ आणि गोवा या राज्यांतील सीबीएसई शाळांचे खेळाडू सहभागी झाले होते. या सामन्यांत उल्लेखनीय कामगिरी करत मुकेश आर पटेल स्कूलचे झलक भाट, याशिका गोयल आणि समृद्धी चव्हाण हे तीन खेळाडू हरियाणा येथे होणाऱ्या सीबीएसई राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात झलक भाट आणि यशिका गोयल यांनी सुवर्णपदक तर,आर्या पाडवी आणि देवांशी पहाडे यांनी कांस्य पदक पटकावले. १९ वर्षांआतील मुलींच्या गटात समृद्धी चव्हाणने रौप्य पदक पटकावले. तर साई बडगुजर आणि दुर्गेश पाटील हे खेळाडू मुलांच्या गटात सहभागी झाले होते. सर्व खेळाडूंनी क्रीडा समन्वयक तथा बॉक्सिंग प्रशिक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शना अंतर्गत हे घवघवीत यश प्राप्त केले.
खेळाडूंच्या या यशाबद्दल एसव्हीकेएम संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे सहअध्यक्ष भुपेशभाई पटेल, शिरपूरच्या नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, एसव्हीकेएम स्कूल डायरेक्टर गिरीजा मोहन, शाळेच्या प्राचार्या मंजु सिंह, एसव्हीकेएम स्पोर्ट्स डायरेक्टर किरण आंचन, असिस्टंट स्पोर्ट्स डायरेक्टर डॉ आशिष शुक्ला यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.