
आरोग्य विज्ञान विद्यापीठात ’संगम हॅकेथॉन’ विषयावर कार्यशाळा संपन्न
नाशिक ः आरोग्य क्षेत्रात येणाऱ्या विविध आव्हानांवर कौशल्य व तंत्रज्ञानाचा वापर करुन संशोधकांनी नावीन्यपूर्ण उपाय शोधणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी ’संगम हॅकेथॉन-२०२५’ च्या समारोप समारंभात केले.
यावेळी मान्यवर परीक्षक मॅजिक इन्क्युबेशन सेंटरचे संचालक प्रसाद कोकिळ, मेड टेकच्या प्रतिनिधी पुजा कदंबी, जस्ट युक्तीच्या संस्थापिका दिव्या अजित्सरिया, रामाशिष भुतडा, डॉ अभय कुलकर्णी, कुंभथॅानचे संस्थापक गिरीश पगारे, निखिल देवरे, सुमित जगदाळे तसेच अनिल भारती आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठाचा ’संगम हॅकेथॉन-२०२५’ हा अभिनव उपक्रम आहे. याद्वारे विद्यार्थ्यांनी समस्यांचे निवारण करण्यासाठी तंत्रज्ञान व कौशल्याचा योग्य वापर करण्याचे तंत्र व मार्गदर्शन करण्यात आले आहे. आरोग्य व तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी विद्यापीठ नेहमीच प्रयत्नशील आहे. ’संगम हॅकेथॅान हे एक असे व्यासपीठ आहे, जिथे तरुण संशोधक, तंत्रज्ञ आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र येऊन या समस्यांवर डिजिटल आणि तांत्रिक उपाय शोधू शकतात. यावेळी त्यांनी आयुष्मान भारत डिजिटल मिशन, सार्वजनिक आरोग्य, वेलनेस कुंभ यांसारख्या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करावे असे त्यांनी सांगितले.
कुलगुरू पुढे म्हणाल्या की, आपल्या देशातील अंतराळ मोहीम किंवा अन्य संशोधनातील संशोधक इतर क्षेत्रातून पुढे आलेले असतात त्यांना प्रोत्साहान देणे गरेजेचे आहे. विद्यार्थ्यांमधील काम करण्याची ऊर्जा उत्प्रेरित करण्याचे काम विद्यापीठाकडून ’संगम हॅकेथॉन-२०२५’ च्या माध्यमातून करण्यात आले आहे. संशोधनात ज्यांना अधिक काम करावयाचे आहे त्यांनी परिसरातील समस्यांचे अवलोकन करावे व त्यावर उपाय शोधण्यासाठी परिश्रम घ्यावेत. संशोधनासाठी योग्य दिशा व मार्गदर्शनाची गरज असते. आर्टीफिशियल इंटॅलिजन्सचा वापर करुन संशोधन केलेल्या घटकांवर अनेक छोटे उद्योग स्थापन करता येतात त्याव्दारा रोजगार व अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल. हा हॅकेथॅान आरोग्य सेवेच्या भविष्याला आकार देणारा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, ’संगम हॅकेथॉन-२०२५’ मधील सर्व सहभागींनी आपल्या कल्पनाशक्तीला वाव देऊन समाजासाठी उपयुक्त संशोधन करावे ज्याव्दारे वयोवृध्दांची काळजी, मानसिक आरोग्य आणि अत्याधुनिक पध्दतीने आरोग्य सेवा यांचा समावेश असेल.त्यासाठी तरुणांच्या कल्पनाशक्तीची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक आहे. विद्यापीठातील हॅकेथॅान केवळ एक स्पर्धा नाही तर एक ’संगम’ आहे जिथे वैद्यकीय ज्ञान आणि तंत्रज्ञान एकत्र येते. यातून तयार होणारे उपाय हे केवळ शैक्षणिक प्रकल्प नसून ते प्रत्यक्ष जीवनात बदल घडवून आणण्याची क्षमता असलेले आदर्श मॅाडेल असतील. या दोन दिवसांत सहभागी विद्यार्थ्यांकडून मिळालेले उपाय आपल्या आरोग्य प्रणालीला नवी दिशा देतील असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, आरोग्य क्षेत्रातील समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी विद्यापीठाने अभिनव व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ’संगम हॅकेथॅान २०२५’ उपक्रमात आरोग्य व अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना एकत्र करुन प्रत्येक टीमला दिलेल्या समस्यांचे सोल्युशन शोधण्यासाठी टास्क देण्यात आले होते. त्यावर त्यांनी आत्मसात केलेले ज्ञान व कौशल्य वापरुन सोल्युशन्स शोधून काढले आहेत. कुलगुरू लेपटनंट जनरल माधुरी कानिटकर यांच्या संकल्पनेतून आरोग्य आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा हा अनोखा संगम हॅकेथॅानच्या माध्यमातून विद्यापीठात घडून आला असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठात मुख्यालयात आयोजित दोन दिवसीय ’संगम हॅकेथॅान २०२५’ करीता १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केली होती यापैकी अंतीम ४० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी ’दिशा’ कक्षाचे इन्कुबेशन मॅनेजर सानिया भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. या उपक्रमाकरीता विद्यापीठाच्या शैक्षणिक शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले