< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); रियाझ अकबर अली, रहीम खान, अभिजीत त्रिपणकर, मोहम्मद गुफरान यांची आगेकूच – Sport Splus

रियाझ अकबर अली, रहीम खान, अभिजीत त्रिपणकर, मोहम्मद गुफरान यांची आगेकूच

  • By admin
  • August 8, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

विनायक निम्हण स्मृती करंडक महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन

पुणे : सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या विनायक निम्हण स्मृती करंडक ५९व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत रियाझ अकबर अली, रहीम खान, अभिजीत त्रिपणकर, मोहम्मद गुफरान यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.

गोविंदा गार्डन मंगल कार्यालय, सोमेश्वर कॉर्नर, बाणेर, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत जागतिक विजेत्या रत्नागिरीच्या रियाझ अकबर अलीने मुंबईच्या निखिल घोलपचे आव्हान २२-६, २५-० असे सहज मोडीत काढले. पुण्याच्या रहीम खानने मुंबई उपनगरच्या राहुल कुटेचा २५-०, २५-० असा तर, आठव्या मानांकित पुण्याच्या अभिजीत त्रिपणकर याने मुंबईच्या निखिल कांबळेचा २५-०, २५-० असा एकतर्फी पराभव केला. मुंबईच्या मोहम्मद गुफरानने मुंबई उपनगरच्या अभिषेक भारंबेचा २५-१४, २५-५ असा पराभव करून आगेकूच केली.

मुंबईच्या ओंकार टिळकने पुण्याच्या आमिर मिर्झाला २५-०, २५-७ असे नमविले. पुण्याच्या जाफर शेखने आपला शहर सहकारी प्रणव गायकवाडचा २५-५, २५-० असा पराभव केला.

उद्घाटन प्रसंगी बोलताना सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व माजी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले की, स्पर्धेचे हे सलग तिसरे वर्ष असून सातत्याने दरवर्षी आम्ही ही कॅरम स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करत आहोत. सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित अशा स्पर्धेच्या माध्यमातून कॅरम या खेळाला एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न राहील.

क्रीडा अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य मिलिंद डांगे यावेळी म्हणाले की, क्रीडा भारतीच्या माध्यमातून केवळ खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि समाजातील अशा प्रतिभावान व्यक्तींना पुढे आणण्याचे काम करण्यात येते. आपल्या देशात कुस्ती, कबड्डी, हॉकी, खो-खो, धनुर्विद्या या पारंपरिक खेळाच्या स्पर्धा वर्षानुवर्षे होत आहे. याबरोबरच कॅरम खेळाच्या देखील स्पर्धा मोठ्या स्वरूपात होत असून सनी निम्हण यांच्या पुढाकाराने सलग तीन वर्षे ही राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा यशस्वीपणे केली जात आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक करतो.

स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य मिलिंद डांगे, सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व माजी नगरसेवक सनी निम्हण, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे चेअरमन भरत देसलडा, एमसीएचे सचिव अरुण केदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजय जाधव, अजित सावंत, झेनेटिक स्पोर्टसचे मालक नरेंद्र पाटणकर, मन्सूर खान, यतिन ठाकूर, अभिजीत मोहिते, आशुतोष ढोमिसे, उमेश वाघ आणि सुशील गुजर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुप्रिया कुणाल यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *