
मुंबई विद्यापीठाच्या कार्यशाळेत कुलगुरू डॉ अजय भामरे यांचे प्रतिपादन
डेरवण : एसव्हीजेसीटी क्रीडा संकुल येथे मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभाग आणि एसएसटी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथ्या क्रीडा शिक्षक कार्यशाळा आणि चर्चासत्राचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. क्रीडा शिक्षकांना आधुनिक आणि तांत्रिक प्रशिक्षण आणि व्यावसायिक दृष्टिकोन प्रदान करण्याच्या उद्देशाने चार दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अजय भामरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक डॉ मनोज रेड्डी, एसएसटी कॉलेजचे संस्थापक प्राचार्य डॉ पुरस्वानी, एसव्हीजेसीटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शैक्षणिक संचालक शरयू यशवंतराव, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर व मुंबई विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांमधील २०० हून अधिक क्रीडा शिक्षक सहभागी झाले होते.
उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी क्रीडा शिक्षणाचे बदलते स्वरूप आणि विद्यार्थ्यांमधील स्पर्धेच्या भावनेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले आणि प्रशिक्षणात तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर भर दिला. या शिक्षकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील विविध तज्ञांनी प्रशिक्षण दिले. अद्ययावत नियमांचे ज्ञान, खेळांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर, क्रीडा मानसशास्त्र, तंदुरुस्ती आणि पोषण आहार यांसारख्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे कार्यशाळेत नॅक मूल्यांकन प्रक्रियेत क्रीडा विभागाची भूमिका यावर चर्चा करण्यात आली.
उद्घाटन प्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अजय भामरे यांनी आपल्या भाषणात क्रीडा शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती विकसित करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता त्यांना मैदानात आणून खेळाद्वारे जीवन कौशल्ये शिकवावीत. अशा सर्व सकारात्मक प्रयत्नांना विद्यापीठ सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगून मार्गदर्शन केले तसेच या कार्यशाळेसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा, प्रशस्त मैदाने, आधुनिक उपकरणे इत्यादि सुविधा असलेले क्रीडा संकुल उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टचे आभार मानतो, असे मनोगत व्यक्त केले.