
छत्रपती संभाजीनगर ः देशपांडे फाउंडेशन, देशपांडे स्किलिंग अंतर्गत स्किल प्लस आरडीआयटी संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमासाठी देवगिरी महाविद्यालयातील स्वप्निल राऊतराय, ऋषिकेश चौधरी, पूजा आगळे, साक्षी शर्मा, गौरव काळे व चैतन्य सदर या भौतिकशास्त्र विभागातील सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
देशपांडे स्किलिंग प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत हुबळी (कर्नाटक) येथे होणाऱ्या चार महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना संगणक प्रगत कौशल्य तसेच माहिती आणि तंत्रज्ञानामधील अद्ययावत बदल, माहिती व तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रामध्ये होऊ घातलेला वापर यासंबंधीच्या सर्व कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच इंग्रजी संप्रेषण कौशल्य, अभियोग्यता, तर्क सुसंगत मांडणी, नेतृत्व विकास, जीवन कौशल्य या संदर्भात देखील विद्यार्थ्यांना सक्षम करून रोजगार पूरक कौशल्यांचा विकास यामधून होणार आहे.
चार महिन्याच्या यशस्वी प्रशिक्षणानंतर देशपांडे फाउंडेशन विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य पंडितराव हर्षे व प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील प्रशिक्षण कार्यक्रम आणि रोजगार संधीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ रवी पाटील, डॉ अपर्णा तावरे, डॉ गणेश मोहिते, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ संतोष मोरे, डॉ मनीषा पाटील, डॉ रणजीत मिस्त्री आणि डॉ सुवर्णा पाटील यांची उपस्थिती होती.