
मुंबई ः बँक ऑफ बडोदा-बीओबी मुंबई विभागीय निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष गटात हनुमंत सुद्रिक तर महिला गटात लोचना जांभूळकर विजेते ठरले.
बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागातर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने झालेल्या दादर-पश्चिम येथील बॅडमिंटन या स्पर्धेत शानदार खेळ करीत हनुमंत सुद्रिकने रवी कुमारचे आव्हान अंतिम फेरीत २१-१४ असे संपुष्टात आणले. बँक ऑफ बडोदा-मुंबई क्रीडा विभागाचे प्रदीप सुरोशे व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण यांनी विजेते-उपविजेत्यांचे अभिनंदन केले.
उपांत्य फेरीच्या सामन्यात आघाडी घेणाऱ्या अजिंक्य नवगिरे याला प्रथम मानांकित हनुमंत सुद्रिक याने नमविले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात रवी कुमारने ऋग्वेद फर्डेचा पराभव केला. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात प्रारंभापासून मोठी आघाडी घेत लोचना जांभूळकरने गरिमा श्रीवास्तवला १५-७ असे हरवून अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. उपांत्य सामन्यात लोचना जांभूळकरने पूजा मोरेवर, तर गरिमा श्रीवास्तवने प्रियांका उपाध्यायवर असा विजय मिळविला.
अखिल भारतीय स्तरावर भोपाळ येथे होणाऱ्या बँक ऑफ बडोदा आंतर विभाग बॅडमिंटन स्पर्धेसाठी मुंबई विभागाच्या पुरुष संघाचे हनुमंत सुद्रिक, रवी कुमार, अजिंक्य नवगिरे, ऋग्वेद फर्डे आणि महिला संघाचे लोचना जांभूळकर, गरिमा श्रीवास्तव, पूजा मोरे, प्रियांका उपाध्याय आदी खेळाडू प्रतिनिधित्व करणार आहेत. स्पर्धेत ४१ खेळाडू सहभागी झाले होते.