
यश ढेंबरे, तन्वी घारपुरे, तनय जोशीला दुहेरी मुकुट
ठाणे ः ३८व्या सीएट यॉनेक्स-सनराईज ठाणे जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत ठाणेच्या बॅडमिंटन खेळाडूंनी धमाका केला. एकूण ३५ पदकांसह ठाणे बॅडमिंटन अकॅडमी खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. या स्पर्धेत यश ढेंबरे, तन्वी घारपुरे आणि तनय जोशी यांना दुहेरी मुकुट संपादन केला.
ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ३८ वी सीएट पुरस्कृत योनेक्स-सनराईज ठाणे जिल्हा ज्युनिअर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून, उपनगरांतील विविध भागांतून तसेच नवख्या पण अत्यंत गुणी खेळाडूंनी या भव्य स्पर्धेत सहभाग घेत १००० हून अधिक प्रवेशिका नोंदवल्या. ही संख्या बॅडमिंटन खेळाची वाढती लोकप्रियता दर्शवणारी ठरली.
या भव्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर पुरोहित आणि ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार कुमार केतकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या दोन्ही मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत त्यांचं कौतुक केले.
“आजच्या युगात खेळ हे केवळ करिअर नाही तर व्यक्तिमत्व घडवणारा मूलभूत आधार आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंनी दाखवलेला आत्मविश्वास आणि मेहनत अतुलनीय आहे,” अशा शब्दांत त्यांनी स्पर्धेच्या दर्जाची आणि खेळाडूंच्या प्रतिभेची प्रशंसा केली. याचप्रमाणे, खेळाडूंच्या पालकांशी संवाद साधत त्यांनी मुलांच्या क्रीडा जडणघडणीसाठी योगदान दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
या स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी २० वेगवेगळ्या प्रकारांमध्ये एकूण ३५ पदके जिंकून जबरदस्त वर्चस्व गाजवले. वेगवेगळ्या वयोगटांतील चुरशीच्या लढतींमध्ये ठाणेच्या चॅम्पियन्सनी आपली झलक दाखवत सुवर्ण, रौप्य व कांस्य अशा तिन्ही रंगांतील पदके पटकावली.

स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक नवोदित खेळाडूंनी आपल्या पहिल्याच जिल्हा स्तरावरील स्पर्धेत चुरशीने खेळ करत भविष्यकाळात होणाऱ्या स्टार बॅडमिंटनपटूची झलक दाखवली. बऱ्याच खेळाडूंनी स्पर्धा संपल्यानंतर व्यक्त केलेल्या भावना आणि प्रतिक्रिया ऐकताना त्यांच्या चेहऱ्यांवर आत्मविश्वास आणि समाधान दिसून येत होते.
स्पर्धेच्या अतिशय यशस्वी आयोजनासाठी ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, स्पर्धा सचिव मयूर घाटणेकर आणि संपूर्ण संघाचे विशेष कौतुक केले जात आहे. नियोजन, वेळेचे काटेकोर पालन, दर्जेदार कोर्ट व्यवस्था, पारदर्शक ड्रॉ आणि खेळाडूंना देण्यात आलेली अनुकूल स्पर्धा वातावरणामुळे सर्व सहभागी खेळाडू, पालक आणि पाहुणे मंडळी अत्यंत समाधानी आणि आनंदित होते.
स्पर्धेचा अंतिम निकाल
९ वयोगट ः १. सामन्य माने, २. पर्ण वाणी. मुली ः १. निष्का शहा, २. यश्वी कोरगावकर.
११ वयोगट ः १. सौरभ दर्जी, २. सात्विक गुप्ता. मुली ः १. शनाया तवाते, २. महाजन.
१३ वयोगट ः १. अरहम भंडारी, २. अल्फी मेक्कादथ. मुली ः १. आराध्या मोहिते, २. आर्या शिंदे.
१५ वयोगट ः १. आदित्य पडवाल, २. मयंक राजपूत. मुली ः १. शनाया ठक्कर, २. अश्विका नायर.
१७ वयोगट ः १. यश धेंबारे, २. यश सिन्हा. मुली ः १. तन्वी घारपुरे, २. अक्षरा बिरादर.