
मुंबई ः दक्षिण कोरियात नुकत्याच पार पडलेल्या २० व्या एशियन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विलेपार्ले येथील स्केटिंग खेळाडूंनी अतिशय उज्वल कामगिरी करत भारत आणि महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवले आहे.
या स्पर्धेत नायशा निशित मेहता हिने सोलो डान्स प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. रिधम हर्षल ममाणिया हिने सोलो डान्स प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. तसेच कॅरोलिन फर्नांडिस हिने रोलर डर्बी प्रकारात रौप्यपदक मिळवले.
या उल्लेखनीय यशाबाबत संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू म्हणाले की, “या सर्व खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता आहे. त्यांच्याकडे सुवर्णपदक पटकावण्याची प्रचंड क्षमता असून, लवकरच त्यांच्या भारतीय संघात निवडीची घोषणा होईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
या यशामागे संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू, सचिव डॉ मोहन अनंत राणे, तसेच स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष पुष्पेंद्र कुमार सिंह, प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच आदेश सिंग आणि कोरियोग्राफर मोनिश कुमार कोटियन यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि योगदान लाभले आहे.