यवतमाळ ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व यवतमाळ जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन ११ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे.
१४ वर्षांखालील मुलांची स्पर्धा सोमवारी सकाळी १० वाजता सुरू होईल. तसेच १२ ऑगस्ट रोजी १७ वर्षांखालील मुलांची तर १३ ऑगस्ट रोजी १९ वर्षांखालील मुलांची स्पर्धा होणार आहे. यवतमाळ येथील दात्ते बीपीएड महाविद्यालय येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
तीन गटांमध्ये कबड्डी स्पर्धेचे तालुका स्तरावर आयोजन करण्यात आले आहे. तरीही ज्या शाळांनी यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्याकडे ऑनलाइन एन्ट्री केली असेल त्याच शाळांना खेळता येईल. या स्पर्धेला उद्घाटक म्हणून विशुद्ध शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायकराव दात्ते, प्राचार्य अमोल देशमुख यांची पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे. विदर्भ हौशी कबड्डी असोसिएशनचे संचालक विश्वनाथ झिंगे, सुवर्णयुग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अभय राऊत, यवतमाळ जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनचे सचिव नंदू वानखेडे, प्रताप पारस्कर, कुलभूषण तिवारी, लाला राऊत, राष्ट्रीय खेळाडू यशवंत मोगळकर, रवी जाधव, सचिन ढोबळे, यवतमाळ जिल्हा कृषी बाजार समितीचे अध्यक्ष रवींद्र ढोक यांच्या उपस्थितीत या यवतमाळ तालुकास्तरीय कबड्डी सामन्याचे उद्घाटन होणार आहे.
यवतमाळ तालुक्यातील जास्तीत जास्त शाळेने या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवा असे आवाहन यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड व यवतमाळ तालुका संयोजक किरण फुलझेले यांनी केले आहे.