 
            जळगाव येथे अस्मिता फुटबॉल स्पर्धेला थाटात प्रारंभ
जळगाव : मुलींच्या उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेली अस्मिता फुटबॉल स्पर्धा यंदा महाराष्ट्रात वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन मार्फत जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेला आयोजनाची संधी मिळाली. या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते गोदावरी फाउंडेशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडले.
यावेळी रक्षा खडसे म्हणाल्या की, “भारतासारख्या मोठ्या देशात फुटबॉल क्षेत्रात प्रगती साधणे सोपे नाही. मात्र अशा स्पर्धांमुळे जिल्ह्यातील व परिसरातील मुलींना फुटबॉलसह क्रीडा क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी मिळत आहे. या स्पर्धेत मुलींच्या सहभागाने सिद्ध केले आहे की त्या कुणापेक्षा कमी नाहीत.” त्यांनी जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या गेल्या वर्षीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक करत सचिव फारुक शेख यांचे विशेष अभिनंदन केले.
रक्षा खडसे यांनी पुढे सांगितले की, मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा विभागाच्या वतीने अशा स्पर्धांचे आयोजन भविष्यातही सुरू राहील.
ही स्पर्धा खेलो इंडिया अंतर्गत क्रीडा व युवा मंत्रालय, भारत सरकार; स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन यांच्या मान्यतेने, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, मुंबई व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गोदावरी फाउंडेशनच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात आली.
उद्घाटन सोहळ्यात गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ केतकी पाटील, जागतिक विजेती व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आयशा खान, जिल्हा संघटनेचे सचिव फारुक शेख, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजयकुमार पाटील, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच प्रवीण ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमातील विशेष क्षण
रक्षा खडसे यांनी प्रथम क्रीडांगण पूजन केले. स्पर्धेची सुरुवात नाणेफेक करून केली. सेंट मेरी, एरंडोल विरुद्ध नागरिक शिक्षण मंडळ, तामसवाडी-पारोळा आणि अक्सा स्पोर्ट्स क्लब विरुद्ध मिल्लत हायस्कूल यांच्यातील सामन्यांचा आनंद रक्षा खडसे यांनी घेतला. 
उद्घाटनानंतर झालेल्या सामन्यांमध्ये मिल्लत हायस्कूल संघाने अक्सा फुटबॉल क्लबचा १-० असा पराभव केला. नागरिक शिक्षण मंडळ, तामसवाडी संघाने सेंट मेरी, एरंडोल संघावर ३-० अशी मात केली. पोदार इंटरनॅशनल स्कूल संघाने गोदावरी फाउंडेशन संघाचा २-० असा पराभव केला. ताप्ती, भुसावळ संघाने पोदार फुटबॉल क्लब संघाविरुद्ध २-० असा विजय संपादन केला.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी फारुक शेख, डॉ अनिता कोल्हे, मनोज सुरवाडे, अॅड आमिर शेख, पीएसआय भास्कर पाटील, नितीन डेव्हिड, थॉमस डिसोझा, वसीम रियाज, साबीर खलील, अरबाज खान, तहसील शेख, वसीम चांद, मोजेस चार्ल्स, राहील अहमद, अनस शेख, अयान पटेल, अली शेख, आवेश खाटीक, सैफ शेख, फोटोग्राफर मोहम्मद कैफ नूर, ड्रोन पायलट दानिश पिंजारी आणि सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.



