 
            विष्णुपंत तात्यासाहेब कोठे स्मृती चषक जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ
सोलापूर ः राज मेमोरियल इंग्लिश स्कूल व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने विष्णुपंत तात्यासाहेब कोठे  यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या १९ व १३ वर्षाखालील गटाच्या जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेला थाटात सुरुवात झाली.
या स्पर्धेत ९ वर्षाखालील गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वराली हातवळणे, मानस गायकवाड यांच्यासह २९ आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसह सोलापुर शहरासह करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी, माळशिरस, माढा आदी तालुक्यातील २०५ खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त धनश्री अतुल देशपांडे (साठे) व डॉ. राधिकाताई चिलका तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्षा शोभा कुलकर्णी व मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने झाले. यावेळी आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, विद्यापीठ खेळाडू संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन विद्या माने यांनी केले. तर स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे, रोहिणी तुम्मा, जयश्री कोंडा, यश इंगळे, प्रज्वल कोरे, पद्मजा घोडके, श्रीराम घोडके आदी काम पाहत आहेत.
मानसिक, शारीरिक व बौद्धिक तंदुरुस्ती आवश्यक
धनश्री देशपांडे (साठे) यांनी खेळाचे दैनंदिन जीवनातील महत्व उपस्थित पालक व खेळाडूंना विषद करत खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी मानसिक, शारीरिक व बौद्धिक तंदुरुस्ती आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच खेळाडूंनी हार व जीतचा विचार न करता जिद्द व चिकाटीने खेळणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.
मानस, प्रसन्नची विजयी सलामी
सुशील रसिक सभागृह येथे रंगलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत अग्रमानांकित व आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त मानस गायकवाड, बार्शीचा प्रसन्न जगदाळे, सैनध्य जमादार, वेद आगरकर, हर्ष हलमल्ली, विराज पठाडे, प्रतीक नामदे, श्रेया संदुपटला, सृष्टी गायकवाड व आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वराली हातवळणे यांनी विजयी सलामी दिली. तर १३ वर्षाखालील गटात मानांकित वेदांत मुसळे, श्रेयस कुदळे, साईराज घोडके, सानवी गोरे, सृष्टी मुसळे, अनन्या उलभगत, पृथा ठोंबरे  व ९ वर्षाखालील गटात हिमांशू व्हानगावडे, समृद्धी कसबे यांनी आकर्षक विजय मिळवीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.



