
त्रिनिदाद ः वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला ५ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही संघांमधील दुसरा एकदिवसीय सामना त्रिनिदाद मधील ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवण्यात आला.
पावसामुळे हा सामना ३७-३७ षटकांचा होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ३७ षटकांत ७ विकेट्स गमावून १७१ धावा केल्या. नंतर पावसामुळे हे लक्ष्य बदलण्यात आले आणि विंडीज संघाला ३५ षटकांत १८१ धावांचे लक्ष्य मिळाले. यजमान संघाने हे लक्ष्य ३३.२ षटकांत ५ विकेट्स गमावून पूर्ण केले आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. यासह, वेस्ट इंडिज संघ सहा वर्षांनंतर एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला पराभूत करण्यात यशस्वी झाला. विश्वचषकादरम्यान वेस्ट इंडिजने ३१ मे २०१९ रोजी पाकिस्तानविरुद्धचा शेवटचा एकदिवसीय सामना जिंकला.
बाबर आझम शून्यावर बाद
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानला त्यांच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात दिली. संघाची धावसंख्या ३७ धावांवर असताना त्यांना सॅम अयुबच्या रूपात ९ व्या षटकात पहिला धक्का बसला. पहिली विकेट पडल्यानंतर पाकिस्तानचा डाव डळमळीत झाला. पाकिस्तानचा धावसंख्या काही वेळातच ८८ धावांवर ४ बाद झाला.
या सामन्यात बाबर आझम आपले खातेही उघडू शकला नाही, तर कर्णधार मोहम्मद रिझवान ३८ चेंडूत १६ धावांची संथ खेळी खेळून बाद झाला. पाकिस्तानचा शेवटचा सामना जिंकणारा हसन नवाजने ३० चेंडूत ३६ धावांची खेळी खेळली आणि संघाला १७१ धावांपर्यंत पोहोचवले. हुसेन तलतनेही ३१ धावांचे योगदान दिले.
रुदरफोर्ड आणि रोस्टन चेसची दमदार फलंदाजी
पाकिस्तानचा डाव संपल्यानंतर पावसामुळे काही काळ खेळ थांबवावा लागला. डीएलएस नियमानुसार, वेस्ट इंडिजला ३५ षटकांत १८१ धावांचे लक्ष्य मिळाले. संघाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचे टॉप ३ फलंदाज ब्रँडन किंग (१ धाव), एविन लुईस (७ धावा), केसी कार्टी (१६ धावा) लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतले. सलामीवीर लवकर बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी जबाबदारी सांभाळली.
कर्णधार शाई होपने ३२ धावांची खेळी खेळून विंडीजला सामन्यात टिकवून ठेवले. त्याच्या खेळीनंतर शेरफेन रुदरफोर्डने ४५ आणि रोस्टन चेसने ४९ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना १२ ऑगस्ट रोजी याच मैदानावर खेळला जाणार आहे. दोन्ही संघांना तो सामना जिंकून मालिका जिंकायची आहे.