
चेन्नई ः भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना, या जागतिक स्पर्धेच्या तयारीसाठी न्यूझीलंडच्या अनेक प्रमुख खेळाडू चेन्नईत पोहोचल्या आहेत. या १० सदस्यीय संघातील सात क्रिकेटपटू केंद्रीय करारबद्ध आहेत आणि मुख्य प्रशिक्षक बेन सॉयर आणि सहाय्यक प्रशिक्षक क्रेग मॅकमिलन यांच्या मार्गदर्शनाखाली चेन्नई सुपर किंग्ज अकादमीमध्ये दोन आठवड्यांच्या शिबिरात सहभागी होत आहेत.
न्यूझीलंड संघ हा महिला टी २० विश्वचषकाचा गतविजेता आहे आणि ३० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक जिंकून दुहेरी विजेतेपद आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल. या सात करारबद्ध खेळाडूंमध्ये वेगवान गोलंदाज जेस केर, तरुण सलामीवीर जॉर्जिया प्लिमर आणि अष्टपैलू ब्रुक हॉलिडे यांचाही समावेश आहे. याशिवाय इझी शार्प, फ्लोरा डेव्हनशायर आणि एम्मा मॅकलिओड सारख्या उदयोन्मुख खेळाडू देखील शिबिरात सहभागी होत आहेत.
मुख्य प्रशिक्षक बेन सॉयर म्हणाले की, सध्या न्यूझीलंडमध्ये हिवाळा असल्याने भारतात सराव शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोनेर सॉयर यांना उद्धृत केले आहे की, ‘सध्या न्यूझीलंडमध्ये हिवाळा आहे आणि सध्या तेथे कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळले जात नाही, तर विश्वचषक सुरू होण्यास दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. मला विश्वास आहे की येथील परिस्थितीशी जुळवून घेतल्यानंतर, आमचे खेळाडू विश्वचषकात चांगली कामगिरी करतील.’
न्यूझीलंड उपखंडातील परिस्थितीत खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञांची मदत देखील घेत आहे. सॉयर म्हणाले, ‘आम्ही गेल्या पाच दिवसांत खूप कठोर सराव केला आहे. आम्ही येथील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कठोर परिश्रम करत आहोत.’ न्यूझीलंड १ ऑक्टोबर रोजी इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आपली मोहीम सुरू करेल.