नवी दिल्ली ः राष्ट्रीय खेळांचा डिस्कस थ्रो सुवर्णपदक विजेता गगनदीप सिंगसह अनेक खेळाडूंवर राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीने (नाडा) तीन वर्षांची बंदी घातली आहे. डोपिंगचा आरोप झाल्यानंतर २० दिवसांच्या आत या खेळाडूंनी त्यांचा गुन्हा मान्य केला होता, ज्यामुळे त्यांची शिक्षा चार वर्षांवरून तीन वर्षांपर्यंत कमी करण्यात आली.
लष्कराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गगनदीपने १२ फेब्रुवारी रोजी उत्तराखंड राष्ट्रीय खेळांमध्ये पुरुषांच्या डिस्कस थ्रोमध्ये ५५.०१ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर तो डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह आढळला. त्याच्या नमुन्यात ‘टेस्टोस्टेरॉन मेटाबोलाइट्स’ची पुष्टी झाल्यानंतर त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले.
या ३० वर्षीय खेळाडूचा बंदीचा कालावधी १९ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होईल. खेळाडूच्या पहिल्या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त बंदीचा कालावधी चार वर्षांचा आहे, परंतु नाडा नियमांच्या कलम १०.८ (निकाल व्यवस्थापन करार) अंतर्गत, जर खेळाडूने त्याचा गुन्हा लवकर स्वीकारला तर त्याची शिक्षा कमी केली जाऊ शकते.
गगनदिनचे राष्ट्रीय खेळांचे पदक परत घेतले जाईल. हरियाणाचा खेळाडू निर्भय सिंगचे रौप्य पदक आता सुवर्णपदकात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. या तरतुदीचा फायदा इतर दोन ट्रॅक अँड फील्ड खेळाडू सचिन कुमार आणि जैनू कुमार यांनाही मिळाला आहे. या अंतर्गत, त्यांचा बंदीचा कालावधी एक वर्षाने कमी करण्यात आला आहे. सचिनची तीन वर्षांची बंदी १० फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे, तर जैनूची ही तारीख २० फेब्रुवारी आहे.
या तरतुदीचा फायदा ज्युदो खेळाडू मोनिका चौधरी आणि नंदिनी वत्स, पॅरा पॉवरलिफ्टर उमेशपाल सिंग आणि सॅम्युअल वनलाल्टनपुईया, वेटलिफ्टर कविंदर, कबड्डी खेळाडू शुभम कुमार, कुस्तीगीर मुगली शर्मा, वुशू खेळाडू अमन आणि राहुल तोमर यांच्यासह एका अल्पवयीन कुस्तीगीराला देण्यात आला आहे. यापैकी बहुतेकांना या वर्षाच्या सुरुवातीला नाडाने तात्पुरते निलंबित केले होते.