
छत्रपती संभाजीनगर ः यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने झाली. शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार अकरावीच्या तासिका ११ ऑगस्ट रोजी सुरू झाल्या आहेत. याचे औचित्य साधून देवगिरी महाविद्यालयात प्रवेशित झालेल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला.
या प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सरस्वती यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, महाविद्यालयात त्यांचे स्वागत करणे, पालकांमध्ये जनजागृती करणे आणि विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यात घट्ट नातं जोडलं जावं, त्यांच्यात विचारांची आदान प्रदान व्हावी, संवाद घडावा हा या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला महाविद्यालयाचा हा पहिला दिवस आठवणीत राहावा व महाविद्यालयाशी त्यांचे ऋणानुबंध जोडले जावे, प्रत्येक विद्यार्थ्याला आपण या महाविद्यालयाचा महत्त्वाचा हिस्सा आहोत ही भावना निर्माण करण्यासाठी नवागत विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य प्रा अरुण काटे, जेईई-नीटचे संचालक प्रा एन जी गायकवाड, उपप्राचार्य प्रा सुरेश लिपाने, उपप्राचार्य प्रा विजय नलावडे, पर्यवेक्षक डॉ सीमा पाटील, पर्यवेक्षक डॉ किरण पतंगे, पर्यवेक्षक प्रा रवींद्र पाटील, पर्यवेक्षक प्रा ज्ञानेश्वर हिवरे यांनी गुलाब फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून व ग्रंथ भेट देवून स्वागत करण्यात आले.
नवी ध्येये, नवी क्षितिजे मिळवण्यासाठी व त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी याप्रसंगी मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती डॉ कल्याण माळी यांनी दिली. प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा स्वाती चव्हाण, प्रा अनिता आढाव, प्रा स्वाती उगले, प्रा अर्चना साळजोशी, प्रा अरुंधती वाडेवाले, प्रा ज्योत्स्ना पाटील, प्रा कविता पवार, प्रा शेख गजाला यांनी परिश्रम घेतले.