
अध्यक्ष शिरीष बोराळकर यांची माहिती, विभागीय क्रीडा संकुलात आयोजन
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर शहरात नंदू नाटेकर स्मृती राज्य वरिष्ठ आंतर जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा आणि भास्करराव सानप स्मृती वरिष्ठ राज्य निवड अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १५ ते २० ऑगस्ट या कालावधीत विभागीय क्रीडा संकुलात रंगणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
विभागीय क्रीडा संकुलात सिंथेटिक कोर्टवर राज्य बॅडमिंटन स्पर्धा एकूण सहा दिवस रंगणार आहे. आंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत राज्यातील २५ हून अधिक जिल्ह्यांचा सहभाग असणार आहे. वरिष्ठ आंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा ही थॉमस कप व उबर कप अशा स्वरुपात होणार आहे. १७ ते २० ऑगस्ट या कालावधीत वैयक्तिक अजिंक्यपद वरिष्ठ राज्य निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे. पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, महिला दुहेरी व मिश्र दुहेरी अशा गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ४०० हून अधिक खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती अध्यक्ष शिरीष बोराळकर आणि राज्य सचिव सिद्धार्थ पाटील यांनी यावेळी दिली.
१५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता खासदार डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक अमित सानप हे अध्यक्षस्थानी राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा उपसंचालक शेखर पाटील हे उपस्थित असतील. राज्य बॅडमिंटन संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिरीष बोराळकर, राज्य सचिव सिद्धार्थ पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू सहभागी होणार असल्याने अतिशय रोमांचक सामने बॅडमिंटन शौकिनांना पहावयास मिळणार आहेत.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा शटल बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर, सचिव सिद्धार्थ पाटील, उपाध्यक्ष विरेन पाटील, कोषाध्यक्ष नितीन इंगोले, मिलिंद देशमुख, अतुल कुलकर्णी, प्रभाकर रापतवार, हिमांशु गोडबोले, ऋतुपर्ण कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, सरफराज खान, चिरायू चौधरी, जावेद पठाण, सिद्धांत जाधव, विजय जाधव, सत्यबोध टाकसाळी, विजय भंडारे, परीक्षित पाटील, निकेत वराडे, निनाद कुलकर्णी, अर्णव बोरीकर, सदानंद महाजन आदींनी पुढाकार घेतला आहे.
एजीएम १७ ऑगस्टला होणार महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेची एजीएम १७ ऑगस्ट रोजी हॉटेल अजंता अॅम्बेसेडर या ठिकाणी होणार आहे. या बैठकीत विविध गोष्टींवर सखोल चर्चा होणार आहे. विदेशी प्रशिक्षक, एमबीएल लीग अशा महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे.
या पत्रकार परिषदेस अमित सानप, उपाध्यक्ष विरेन पाटील, अतुल कुलकर्णी, हिमांशु गोडबोले, अरुण गुदगे, विशाल पांडे आदी उपस्थित होते.