
छत्रपती संभाजीनगर ः पालघर येथे वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेतर्फे आयोजित आंतर जिल्हा राज्यस्तरीय महिला फुटबॉल स्पर्धेत प्री-क्वार्टर फायनल सामन्यात छत्रपती संभाजीनगर संघाने बलाढ्य जळगाव संघावर १-० असा विजय मिळवला.
या स्पर्धेत आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या संघाने चांगली कामगिरी केली आहे. छत्रपती संभाजीनगरचा पहिला सामना सोलापूर संघासोबत झाला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर संघाने ५-० असा दणदणीत विजय संपादन केला. या लढतीत श्रेया इंगोलेने ३, तनिष्का बरके व गौरी कुलकर्णीने प्रत्येकी १ गोल केला. दुसरा प्री कॉटर सामना हा बलाढ्य जळगाव संघासोबत झाला अतिशय अटीतटीच्या सामन्यामध्ये तनिष्का बरखे हिने संघासाठी विजयी गोल नोंदवला. तिला गौरी कुलकर्णी, प्रीती पवार, सोनाली राजपूत, श्रेया इंगोले आणि संपूर्ण संघाने उत्कृष्ट साथ दिली. या विजयामुळे संभाजीनगर संघाने स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष उमर खान, अशफाक खान, जिल्हा सचिव रणजीत भारद्वाज, तसेच स्टीफन डिसुजा, खलील पटेल, बदर चाऊस यांनी संघाचे अभिनंदन केले आहे. या संघाला प्रशिक्षण मोहम्मद रियाजुद्दीन व डॉ अब्दुल रहीम यांनी दिले असून त्यांचे मोलाचे योगदान आहे. आता क्वार्टर फायनलमध्ये छत्रपती संभाजीनगरचा सामना यवतमाळ संघाशी होणार आहे.