
डी स्पोर्ट्स प्रेझेंट डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेला शानदार सुरुवात
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट डी ११ टी २० लीगच्या नव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या लीगच्या तिसऱया हंगामात व्हिजन क्रिकेट अकॅडमी, इम्रान पटेल नाबाद २२ आणि डीएफसी श्रावणी या संघांनी शानदार विजय साकारत आगेकूच केली आहे. प्रदीप जगदाळे, पंकज, विजय जाधव हे सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले.








रुफीट मैदानावर ही क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास संयोजक निलेश गवई, तनवीर राजपूत, अमन अदलखा, फिरोज खान, अक्षय सूर्यवंशी, गौरव चामले, कृष्णा बोर्डे, शिवाजी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
व्हिजन क्रिकेट अकॅडमी संघाने एमजीएम क्रिकेट अकॅडमी संघाचा चुरशीच्या झुंजीत २१ धावांनी पराभव केला. या सामन्यात व्हिजन अकॅडमीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात नऊ बाद १८७ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना एमजीएम अकॅडमीने १९ षटकात सर्वबाद १६६ धावा काढल्या. विजय जाधव हा सामनावीर ठरला.
या सामन्यात रामेश्वर दौड याने अवघ्या ३७ चेंडूत ७६ धावांची तुफानी फलंदाजी केली. त्याने पाच टोलेजंग षटकार व आठ चौकार मारले. रोहित पटेल याने ४२ धावा तर पियुष अष्टेकर याने २९ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत ओमकार कर्डिले (३-२५), वेदांत काटकर (२-२२) व आदित्य सुरडकर (२-३०) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.
पूरब जैस्वाल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि २० षटकात सात बाद १६० धावा काढल्या. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना इम्रान पटेल नाबाद २२ संघाने १५.१ षटकात दोन बाद १६५ धावा फटकावत आठ विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. या लढतीत प्रदीप जगदाळे (५७), तौफिक शेख (४६), आकाश बोराडे (३८) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत व्यंकटेश सोनवलकर (२-२९), बबलू पठाण (२-३१), इम्रान अली खान (१-२३) यांनी प्रभावी मारा केला. या सामन्यात ३५ चेंडूत अर्धशतक ठोकणारा प्रदीप जगदाळे हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
या स्पर्धेचा प्रारंभ डीएफसी श्रावणी आणि महारन ११ यांच्यातील सामन्याने झाला. या लढतीत डीएफसी श्रावणी संघाने २० षटकात चार बाद १९४ धावा फटकावत सामन्यात वर्चस्व गाजवले. महारन ११ संघ १८.३ षटकात १३८ धावांत सर्वबाद झाला. डीएफसी श्रावणी संघाने हा सामना ५६ धावांनी जिंकला.
या सामन्यात अमान शेख (५३), पंकज (४३), सुरज गोंड (३०) यांनी धमाकेदार फलंदाजी केली. अविष्कार नन्नावरे (२-१३), तनवीर राजपूत (२-३२) व पंकज (२-२८) यांनी घातक गोलंदाजी केली. अष्टपैलू कामगिरी नोंदवणारा पंकज हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.