
सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यात आत्मसमर्पण करण्यास सांगितले
नवी दिल्ली ः छत्रसाल हत्याकांड प्रकरणात दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. १३ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती विजेता सागर धनखड यांच्या हत्येतील मुख्य आरोपी सुशील कुमारचा जामीन रद्द केला आणि त्यांना एका आठवड्यात आत्मसमर्पण करण्यास सांगितले. न्यायमूर्ती संजय करोल आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने सुशील कुमार यांना जामीन देण्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचा ४ मार्चचा आदेश रद्द केला.
न्यायालयाचा हा आदेश सागरचे वडील अशोक धनखड यांच्या याचिकेवर आला, ज्यामध्ये त्यांनी उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशाला आव्हान दिले होते. अशोक धनखड यांच्या वतीने वरिष्ठ वकील सिद्धार्थ मृदुल सर्वोच्च न्यायालयात हजर राहिले, तर सुशील कुमार यांचे प्रतिनिधित्व अधिवक्ता महेश जेठमलानी यांनी केले. आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात आपला निकाल दिला आहे.
कुस्तीगीर सागर धनखडच्या हत्येप्रकरणी सुशील २०२१ पासून न्यायालयीन कोठडीत होता. दिल्ली उच्च न्यायालयाने मार्चमध्ये खटल्याच्या प्रक्रियेत विलंब होत असल्याचे कारण देत त्याला जामीन मंजूर केला होता. तथापि, या प्रकरणातील तपास अजूनही सुरू आहे. यामुळे न्यायालयाने सुशील कुमारला एका आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत.
कुस्तीच्या जगात आपले नाव कमावणाऱ्या सुशीलचे नाव खून प्रकरणात समोर आले तेव्हा या बातमीने देशाला धक्का बसला. त्याने २००८ च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक आणि २०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये कुस्तीमध्ये रौप्यपदक जिंकले. तो दोन ऑलिंपिक पदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. तथापि, या प्रकरणातील न्यायालयीन कार्यवाही अजूनही सुरू आहे आणि आता यानंतर न्यायालय त्याच्याबद्दल काय निर्णय देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.