
डी ११ लीग क्रिकेट : वसीम मस्तान, हुसेन आमोदी सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : डी स्पोर्ट्स प्रेझेंट डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत एम के डेव्हलपर्स आणि टीम एक्सएल या संघांनी शानदार विजय साकारत आपली आगेकूच कायम ठेवली. या लढतीत वसीम मस्तान व हुसेन आमोदी हे सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले.

रुफीट क्रिकेट मैदानावर डी ११ लीग स्पर्धा होत आहे. निलेश गवई याने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. बुधवारी झालेल्या पहिल्या सामन्यात एम के डेव्हलपर्स संघाने एस डब्ल्यू मल्टीमीडिया संघावर ४१ धावांनी विजय नोंदवला. दुसऱ्या सामन्यात टीम इलेव्हनने रायझिंग स्टार संघाचा ८० धावांनी पराभव केला.
एम के डेव्हलपर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि १८.३ षटकात सर्वबाद १३७ धावसंख्या उभारली. या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात एस डब्ल्यू मल्टीमीडिया संघ १५.४ षटकात ९६ धावांत सर्वबाद झाला. एम के डेव्हलपर्स संघाने ४१ धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात धीरज थोरात (३०), स्वप्नील जेजूरकर (३०) व शेख अबुझर (२०) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत वसीम मस्तान (३-१३), रोहन राठोड (३-२१) व दादासाहेब (२-१७) यांनी प्रभावी गोलंदाजी केली. वसीम मस्तान हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
दुसऱ्या सामन्यात टीम एक्सएल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम एक्सएल संघाने २० षटकात सात बाद २०२ असा धावांचा डोंगर उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. रायझिंग स्टार संघ धावांचा पाठलाग करताना १८.४ षटकात १२२ धावांत सर्वबाद झाला. टीम एक्सएल संघाने तब्बल ८० धावांनी दणदणीत विजय मिळवला.
या सामन्यात हुसेन अमोदी याने ३६ चेंडूत ५२ धावांची धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. त्याने पाच चौकार व एक षटकार मारला. अजय सिंग राजपूत याने २७ चेंडूत ५० धावा फटकावल्या. त्याने दोन षटकार व सात चौकार मारले. इक्बाल खान याने नऊ चौकार व एक षटकार ठोकत २४ चेंडूत ४४ धावा काढल्या. गोलंदाजीत मोहम्मद अली (३-१८), युनूस पठाण (२-११), कृष्णा काकडे (२-३७) यांनी प्रभावी गोलंदाजी करत विकेट घेतल्या. या सामन्यात हुसेन आमोदी हा सामनावीर ठरला.