
राज्य बॅडमिंटन स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा संघ जाहीर
छत्रपती संभाजीनगर ः योनेक्स सनराईज प्रस्तूत नंदू नाटेकर स्मृती महाराष्ट्र राज्य वरिष्ठ आंतर जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा आणि भास्करराव सानप स्मृती वरिष्ठ राज्य निवड चाचणी चॅम्पियनशिप या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा संघ घोषित करण्यात आला आहे. आंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेला शुक्रवारी (१५ ऑगस्ट) शानदार प्रारंभ होणार आहे.
विभागीय क्रीडा संकुलात सिंथेटिस कोर्टवर राज्य बॅडमिंटन स्पर्धा रंगणार आहे. राज्य बॅडमिंटन स्पर्धा १५ ते २० ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. आंतर जिल्हा व राज्य निवड चाचणी या दोन्ही स्पर्धांना मोठा प्रतिसाद लाभला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा शटल बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर व सचिव सिद्धार्थ पाटील यांनी जिल्हा संघाची घोषणा गुरुवारी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर पुरुष संघात राघव धुमक, अर्णव रश्मी शिरीष, निनाद कुलकर्णी, सुजल पवार, निकेत वरडे, उदयन देशमुख, आदित येन्गरेड्डी या खेळाडूंचा समावेश आहे. महिला संघात सोनाली मिरखेलकर, संस्कृती सातारकर, वृषाली ताडमडगे, सारा साळुंके, अदिती पाटील, निरंजनी देशपांडे या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी हिमांशु गोडबोले आणि व्यवस्थापक म्हणून अतुल कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघातील सर्व खेळाडूंचे अध्यक्ष शिरीष बोराळकर, सचिव सिद्धार्थ पाटील, दिनकर तेलंग, विरेन पाटील, अरुण गुदगे आदींनी अभिनंदन करुन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
उद्घाटन सोहळा
विभागीय क्रीडा संकुलात शुक्रवारी ११ वाजता स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी खासदार डॉ भागवत कराड यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक अमित सानप, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिरीष बोराळकर, सरचिटणीस सिद्धार्थ पाटील हे उपस्थित राहणार आहेत.