
अंतिम फेरीत टॉटेनहॅम संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवले
नवी दिल्ली ः चॅम्पियन्स लीग चॅम्पियन पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) संघाने बुधवारी टॉटेनहॅम संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवून यूईएफए सुपर कप जिंकून त्यांचे स्वप्नवत अभियान सुरू ठेवले. या वर्षी या फ्रेंच फुटबॉल क्लबची ही पाचवी ट्रॉफी आहे.
नुनो मेंडेसने शूटआउटमध्ये निर्णायक स्पॉट किकचे रूपांतर करून पीएसजीचे शानदार पुनरागमन यशस्वी केले. चॅम्पियन्स लीग आणि युरोपा लीगच्या विजेत्यांमध्ये खेळल्या गेलेल्या या वार्षिक सामन्यात टॉटेनहॅम निर्धारित वेळेच्या ८५ व्या मिनिटापर्यंत २-० ने आघाडीवर असल्याने पीएसजीचा विजय एका क्षणी अशक्य वाटत होता.
ली कांग-इनने तळाच्या कोपऱ्यात शक्तिशाली शॉट मारून पीएसजीसाठी पहिला गोल केला तर त्याचा सहकारी गोंकालो रामोस याने इंज्युरी टाइमच्या चौथ्या मिनिटाला बरोबरी साधून उडीन याच्या स्टेडिओ फ्रुली येथे खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्यात स्कोअर २-२ केला.
पेनल्टी शूटआऊटमध्ये, विटिनाने पीएसजीसाठी पहिला प्रयत्न चुकवला. त्यानंतर, टॉटेनहॅम पुन्हा एकदा शूटआउटमध्ये २-० अशी आघाडी घेऊन अपसेट करण्याच्या स्थितीत आला. परंतु त्यांचे खेळाडू मिकी व्हॅन डी व्हेन आणि मॅथियास टेल पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करू शकले नाहीत तर पीएसजीने सलग चार पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केले. पीएसजीने या वर्षी चॅम्पियन्स लीग, लीग १ आणि कूप डी फ्रान्सचे ट्रेबल जिंकले. जानेवारीमध्ये त्यांनी ट्रॉफी डेस चॅम्पियन्स देखील जिंकले आहेत.