
मुंबई : क्रिकेट प्रशिक्षक ज्वाला सिंग यांच्या एमसीसी (मुंबई क्रिकेट क्लब) च्या वतीने त्यांच्या अकादमीतील युवकांना इंग्लिश वातावरणात खेळण्याचा अनुभव मिळावा यासाठी ५० दिवसांच्या इंग्लंड दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यात त्यांचा १६ वर्षाखालील मुलांचा संघ आणि १९ ते ३० वयोगटातील मुलांचा संघ असे दोन संघ या दौऱ्यात सहभागी झाले होते. या दौऱ्यात ते २२ सामने खेळले आणि १८ सामने जिंकले आणि त्यापैकी केवळ चार सामन्यात त्यांना हार पत्करावी लागली. या सामन्यांमध्ये देव जमूला याने दोन शतकी खेळींसह ६०० धावा केल्या तर मुंबईचे साहिल जाधव आणि अयाझ खान या युवकांनी प्रत्येकी ४०० धावा करून आपण मोठ्या सामन्यात खेळण्यासाठी तयार असल्याचे दाखवून दिले आहे.
या दौऱ्यात ते विविध क्लब, एटन कॉलेज, हॅरो स्कूल, हॅम्पटन स्कूल, चेस क्रिकेट क्लब, स्टोर स्कूल अशा विविध संघांविरुद्ध सामने खेळले. या खेळाडूंना या दौऱ्यादरम्यान भारताचे माजी सलामीवीर वासिम जाफर तसेच मुंबई क्रिकेट क्लब चे संस्थापक संचालक विनायक सामंत आणि भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि पृथ्वी शॉ यांचे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रतिवर्षी आपल्या अकादमीतील मुलांसाठी इंग्लंड दौरा करणाऱ्या ज्वाला सिंग यांनी आता इंग्लंड मधील स्लाव्ह येथे ज्वाला तेज प्रताप सिंग क्रिकेट अकादमी या नावाने क्रिकेट अकादमीची सुरुवात केली आहे. दौऱ्यातील पहिले २० दिवस दोन्ही संघाना क्रिकेट सामन्यांचा अनुभव दिल्यानंतर ज्वाला सिंग यांनी स्लाव्ह क्रिकेट क्लबच्या सहकार्याने आणि एमसीसीच्या प्रशिक्षकांच्या साहाय्याने ३० दिवसांचा हाय परफॉर्मन्स कॅम्प आयोजित केला होता. यात दौऱ्यावरील अकादमीच्या मुलांसोबत प्रामुख्याने इंग्लंडमधील युवा खेळाडूंचा देखील समावेश होता. भारतीय पद्धतीच्या क्रिकेटचे ज्ञान इंग्लिश खेळाडूंना देण्यासाठी या क्रिकेट अकादमीची स्थपणा करण्यात आली असून यात १६ वर्षाखालील तसेच हॅम्पशायर, सरे, केंट, मिडलसेक्स, बर्कशायर, यॉर्कशायर या कौंटी संघातील युवा खेळाडू आणि संयुक्त अरब अमिराती येथून देखील खेळाडू सहभागी झाले होते.
भारताविरुद्ध इंग्लंडच्या १९ वर्षाखालील मुलांच्या संघाचे नेतृत्व करणारा हमजा शेख हा तर मुंबईत एमसीसीच्या अकादमीत प्रशिक्षणासाठी खास दाखल झाला होता. अशा अकादमीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकतील असे खेळाडू घडविणे हेच आपले ध्येय असल्याचे ज्वाला सिंग यांनी म्हटले आहे.