
छत्रपती संभाजीनगर ः स्पेशल ऑलिम्पिक भारताच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पाच सुवर्ण पदकांसह एकूण १३ पदके जिंकली.

कांदिवली येथे सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलावावर स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्रतर्फे जलतरणाची राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत २२ राज्यातील ९० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्राच्या संघात पुणे ३, नागपूर मुंबई उपनगर व रायगड प्रत्येकी २, नाशिक व ठाणे यांच्या प्रत्येकी १ खेळांडूचा समावेश होता. छत्रपती संभाजीनगरच्या कांचन बडवे यांची मुलींच्या संघाच्या प्रशिक्षकपदी तर सागर बडवे यांची तांत्रिक अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते झाले. या दरम्यान खेळाडूंनी शानदार संचलन केले. स्पर्धेचा समारोप समारंभ मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमाला स्पेशल ऑलिम्पिक भारताच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मलिका नड्डा, दिव्यांग कल्याण विभाग मंत्री अतुल सावे हे प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यपालांनी या खेळाडूचे कौतुक करण्याबरोबर त्यांना सर्वतोपरी सहकार्य व मदत केली जाईल असे आश्वासन दिले.
मलिका नड्डा यांनी संघटनेची कार्यप्रणाली, दृष्टीकोण व उद्दिष्ट्ये यांची माहिती दिली. मंत्री अतुल सावे यांनी या मुलांच्या अडचणीची जाणीव आहे असे सांगत सागर बडवेच्या कार्याचा उल्लेख केला. खेळाडूंना कोणत्याही प्रकारची कमतरता पडू देणार नाही असे आश्वासन दिले.
या स्पर्धे दरम्यान २०२७ मध्ये चिली येथे होणाऱया स्पेशल ऑलिम्पिकच्या प्रशिक्षण शिबिराच्यादृष्टीने खेळाडूंच्या कामगिरीचे निरीक्षण राष्ट्रीय संघटनेचे राजशेखर यांनी केले. या स्पर्धेत महाराष्ट्राने संघाने एकूण ५ सुवर्ण, ५ रौप्य, ३ कांस्य पदकांची कमाई केली.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्राच्या अध्यक्ष डॉ मेधा सोमय्या, क्षेत्र संचालक डॉ भगवान तलवारे, क्रीडा संचालक जितेंद्र ढोले व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.