
चेन्नई ः जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमर याने चमकदार कामगिरी करत चेन्नई ग्रँड मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद एक फेरी शिल्लक असताना जिंकले.
पांढऱ्या सोंगट्यांसह खेळताना २० वर्षीय कीमर याने नेदरलँड्सच्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्टविरुद्ध सामना बरोबरीत सोडवला. इतर निकालांमुळे कीमर याचे स्पर्धेतील विजेतेपद निश्चित झाले. कीमरच्या वर्चस्वामुळे तो लाईव्ह रेटिंग यादीत जगातील टॉप १० खेळाडूंमध्येही पोहोचला. त्यामुळे खेळातील टॉप खेळाडूंमध्ये त्याचा प्रवेश निश्चित झाला.
कीमर म्हणाला, लाईव्ह रेटिंगमध्ये टॉप १० मध्ये प्रवेश करणे ही एक मोठी कामगिरी आहे जी मी बऱ्याच काळापासून साध्य करू इच्छित होतो आणि अखेर माझ्या मेहनतीचे फळ मिळाले याचा मला खूप आनंद आहे. स्पर्धा जिंकणे तसेच टॉप १० मध्ये स्थान मिळवणे हे माझ्यासाठी खूप छान आणि खूप खास आहे.
मास्टर्स प्रकारात पाचही सामने अनिर्णित राहिले. त्यामुळे अंतिम फेरीत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानासाठीची लढाई कायम राहिली. नवव्या दिवशी एकमेकांशी सामना करणारे अर्जुन एरिगेसी आणि कार्तिकेयन मुरली यांच्यात अनेक जवळचे दावेदार आहेत आणि शेवटच्या दिवशी मिळणारा प्रत्येक अर्धा गुण रँकिंग आणि महत्त्वपूर्ण फिडे रेटिंग वाढीसाठी महत्त्वाचा असेल. चॅलेंजर्स प्रकारात, ग्रँडमास्टर प्रणेश एम (६.५) याने ग्रँडमास्टर हरिका द्रोणवल्लीवर विजय मिळवून शेवटच्या दिवशी अर्ध्या गुणांची आघाडी घेतली आणि गुणतालिकेवर आपली पकड मजबूत केली.
प्रणेशच्या अगदी मागे, ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिक याने ग्रँडमास्टर दिप्तयन घोषला पराभूत केल्यानंतर शर्यतीत आहे तर ग्रँडमास्टर लिओन ल्यूक मेंडोंकाने ग्रँडमास्टर पा इनियान सोबतच्या बरोबरीने अभिमन्यूशी बरोबरी साधली. ही जोडी प्रणेशपेक्षा फक्त अर्धा गुणांनी मागे आहे. ग्रँडमास्टर अधिबान बास्करनने आंतरराष्ट्रीय मास्टर हर्षवर्धन जीबीवर विजय मिळवला तर ग्रँडमास्टर आर्यन चोप्राने ग्रँडमास्टर वैशाली रमेश बाबूचा पराभव केला.