
नूतन विद्यालय क्रीडा विभाग व खेळाडूंतर्फे आयोजन
सेलू ः सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल नूतन विद्यालय क्रीडा विभाग व खेळाडूंच्या वतीने नूतन इनडोअर क्रीडा हॉलमध्ये सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी नूतन विद्यालय क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे, तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक,रामेश्वर गाडेकर, रघुनाथ टाके, विजय खरात, पोलीस कर्मचारी हरी खूपसे, रनमाळ आदी मान्यवरांनी सत्कार केला.

या प्रसंगी बोलताना उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक वाघमारे म्हणाले की, खेळाडूंनी जिद्द, चिकाटी, मेहनत खिलाडूवृत्ती वतीने मैदानावर पदक प्राप्त करून उच्च पदावर नोकरी करून आपल्या आई-वडिलांचा व गुरुजींचा सन्मान वाढवावा. देशभरातील प्रशंसनीय पोलीस सेवेसाठी दरवर्षी दिले जाणारे राष्ट्रपती पदक यंदा स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झाले असून महाराष्ट्रातील एकूण ३८ पोलीस अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. या मानाच्या यादीत सेलू उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे यांचा समावेश झाला आहे.
महाराष्ट्र पोलीस सेवेतील त्यांच्या कर्तृत्व, निष्ठा आणि उत्कृष्ट कार्यामुळे हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. पोलीस सेवेत कार्यरत असताना शिस्तबद्ध कारभार, गुन्हेगारी नियंत्रण, जनतेशी सुसंवाद आणि उत्कृष्ट तपास कार्य यासाठी वाघमारे यांची कामगिरी विशेष ठरली आहे. दरम्यान, पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे अभिनंदन केले.