
चेन्नई ः अंतिम फेरीत अपयशी ठरल्यानंतर भारतीय ग्रँडमास्टर एम प्रणेश याने क्वांटबॉक्स चेन्नई ग्रँडमास्टर्समध्ये चॅलेंजर्स श्रेणीचे जेतेपद जिंकले तर मास्टर्स श्रेणीत आधीच जेतेपद मिळवलेल्या विन्सेंट कीमरने रे रॉबिन्सनवर सहज विजय मिळवून आपल्या मोहिमेचा शेवट शानदार पद्धतीने केला. या विजयासह कीमरला २५ लाख रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली. गुरुवारीच त्याने जेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते, त्यामुळे सर्वांच्या नजरा चॅलेंजर्स श्रेणीवर होत्या.
या श्रेणीत नाट्यमय चढ-उतार पाहायला मिळाले. पा इनियनने अभिमन्यू पुराणिकचा पराभव केला तर अधिबान भास्करन याने लिओन ल्यूक मेंडोन्काचा पराभव केला. लिओन आणि अभिमन्यू दुसऱ्या क्रमांकावर राहिले. दिप्तयन घोष आणि आर्यन चोप्रानेही अनुक्रमे वैशाली रमेशबाबू आणि द्रोणवल्ली हरिका यांचा पराभव करून चांगली कामगिरी केली. अंतिम फेरीत प्रणेश (६.५ गुण) जीबी हर्षवर्धनकडून पराभूत झाला परंतु तो जेतेपद जिंकण्यात यशस्वी झाला ज्यासाठी त्याला सात लाख रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली. मास्टर्स प्रकारात, अर्जुन एरिगाईसीने कार्तिकेयन मुरली आणि अनिश गिरी यांच्यासह संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले.