
खासदार डॉ भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर ः योनेक्स-सनराईज नंदू नाटेकर मेमोरियल महाराष्ट्र राज्य वरिष्ठ आंतरजिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा आणि श्री भास्करराव सानप मेमोरियल वरिष्ठ राज्य निवड स्पर्धेला विभागीय क्रीडा संकुलात मोठ्या थाटात सुरुवात झाली. या स्पर्धेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद लाभला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा शटल बॅडमिंटन असोसिएशनतर्फे, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अधिपत्याखाली योनेक्स-सनराईज नंदू नाटेकर मेमोरियल महाराष्ट्र राज्य वरिष्ठ आंतरजिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा आणि श्री भास्करराव सानप मेमोरियल वरिष्ठ राज्य निवड स्पर्धा १५ ते २० ऑगस्ट दरम्यान विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेली आहे. राज्यातील २५ हून अधिक संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन खासदार डॉ भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात ाले. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक अमित सानप, त्यांची पत्नी सारिका सानप तसेच त्यांच्या आई विजया सानप, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे डेप्युटी प्रेसिडेंट शिरीष बोराळकर व संघटनेचे राज्य सचिव सिद्धार्थ पाटील यांचा जिल्हा शटल संघटनेच्या सर्व पदाधिकारी, कोचेस व खेळाडू यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत मुख्य पंच विनय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १८ पंच काम पाहत आहेत. या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी जिल्हा शटल बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष शिरिष बोराळकर, सचिव सिद्धार्थ पाटील, उपाध्यक्ष विरेन पाटील, कोषाध्यक्ष नितीन इंगोले, मिलिंद देशमुख, अतुल कुलकर्णी, प्रभाकर रापतवार, ऋतुपर्ण कुलकर्णी, कृपा तेलंग, हिमांशु गोडबोले, सचिन कुलकर्णी, सरफराज खान, चिरायू चौधरी, जावेद पठाण, सिद्धांत जाधव, विजय जाधव, सत्यबोध टाकसाळी, विजय भंडारे, परीक्षित पाटील, निकेत वराडे, निनाद कुलकर्णी, अर्णव बोरीकर, सदानंद महाजन आदी प्रयत्न करत आहेत.
उद्घाटन सोहळ्यानंतर झालेल्या स्पर्धेत पुरुष संघात पालघर जिल्ह्याने पुणे जिल्ह्याला तर सातारा जिल्ह्याने अकोला जिल्ह्याला ३-० ने सरळ मात दिली. लातूर जिल्ह्याने रायगड जिल्ह्याला व कोल्हापूर जिल्ह्याने अहिल्यानगर जिल्ह्याला तसेच लातूर जिल्ह्याने जालना जिल्ह्याला ३-० ने सरळ मात दिली तसेच रत्नागिरी जिल्ह्याने नांदेड जिल्ह्याला ३-२ ने अटी-तटीच्या लढतीत पराभूत केले. जळगाव जिल्ह्याने बुलढाणा जिल्ह्याला, नागपूर जिल्ह्याने कोल्हापूर जिल्ह्याला, मुंबई उपनगर संघाने रत्नागिरी संघाला ३-० ने हरवले. परभणी जिल्ह्याने सोलापूर जिल्ह्यावर ३-२ ने विजय मिळवला. महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित ठाणे संघाने नाशिक जिल्ह्याला ३-२ ने अटी-तटीच्या लढतीत पराभूत करून पुढील फेरीत प्रवेश केला. तसेच यजमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने स्पर्धेतील स्थान कायम ठेवले. जळगाव जिल्ह्याने चंद्रपूर जिल्ह्याला ३-१ ने पराभूत केले