
सरस्वती भुवन संस्थेचे अध्यक्ष दिनेश वकील यांच्या हस्ते सत्कार
छत्रपती संभाजीनगर ः नोएडा, उत्तर प्रदेश येथे नुकत्याच झालेल्या सब ज्युनिअर मुले आणि मुलींच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणारी श्री सरस्वती भुवन हायस्कूल छत्रपती संभाजीनगरची खेळाडू ओवी अभिजीत अदवंत हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले.
या स्पर्धेत अंतिम सामन्यात ओवी अदवंत हिने कर्नाटकच्या खेळाडूचा ३-२ असा निर्णायक पराभव करून महाराष्ट्राला चौथे सुवर्णपदक मिळवून दिले आणि नॅशनल चॅम्पियनशिप पटकावली. या शानदार कामगिरीबद्दल श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेमध्ये तिचा १५ ऑगस्ट रोजी सत्कार आयोजित करण्यात आला होता.

श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनेश वकील यांच्या हस्ते ओवी अदवंत हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिनेश वकील यांनी ओवी हिच्या यशाबद्दल कौतुक करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच तिच्या पुढील शिक्षणासाठी संस्थेच्या वतीने मदत करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ बाळकृष्ण क्षीरसागर, सहचिटणीस डॉ रश्मी बोरीकर, सहचिटणीस सुनील देशपांडे, स्थानिक शालेय समिती अध्यक्ष ज्ञानप्रकाश मोदाणी, श्री सरस्वती भुवन प्रशालेचे मुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ, शारदा मंदिर प्रशालेच्या मुख्याध्यापिका डॉ सविता मुळे, डॉ दयानंद कांबळे, डॉ विशाल देशपांडे यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कंटुले यांनी केले.