
सासवड ः श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, वाघिरे महाविद्यालय, सासवड येथे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा प्रीतम ओव्हाळ यांच्या संकल्पनेतून मुलींची दहीहंडी स्पर्धा ‘समतेची दहीहंडी – नारीशक्तीची दहीहंडी’ हे घोषवाक्य घेऊन साजरी करण्यात आली.

यावेळी दहीहंडीचे थर लावण्यासाठीची मुलींची लगबग, प्रयत्न दिसून आले. सर्व महाविद्यालयातील मुलींनी अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात दहीहंडीत सहभाग घेतला. दहीहंडी स्पर्धेत “राजमाता जिजाऊ संघ”, “राजमाता अहिल्याबाई संघ”, “क्रांतीज्योती सावित्रीबाई संघ”, “माता रमाई संघ” असे एकूण चार संघ सहभागी झाले होते. परंतु पहिल्या संधी दरम्यान चारही संघाना दहीहंडी फोडण्यात अपयश आले. त्यानंतर चारही संघांनी आपसात चर्चा करून चारही संघांनी एकत्रित दहीहंडी फोडण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आणि वेगवेगळ्या संघाचे टी शर्ट घातलेल्या या नारीशक्तीने कोणतेही मोठे कार्य करायचे असल्यास सर्व स्त्रियांना एकत्रित येणे किती गरजेचं आहे हे कृतीतून दाखवून दिले.

दहीहंडीच्या दोरखंडाला स्त्रियांच्या उत्थानासाठी जगभरात जे साहित्य लिहिले गेले त्यांच्या पुस्तकाचे पहिले पान पताकांच्या रूपात सजविले होते. समीक्षा गोफणे होणे दहीहंडी यशस्वीरित्या फोडल्यानंतर गोविंदा गाण्यावर मनसोक्त आनंद लुटला.
मुलींची दहीहंडी यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी मुलींना प्रोत्साहन दिले. महाविद्यालयाच्या वतीने दहीहंडीतील सहभागी सर्व मुलींना संरक्षणात्मक हेल्मेट, मॅट व इतर बाबी देण्यात आल्या होत्या. सदर दहीहंडी मध्ये सहभाग घेतलेल्या सर्व संघाना सामाईक रित्या पोलिस उपनिरीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते”नारी शक्ती दहीहंडी चषक २०२५” देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ बी यु माने, डॉ संजय झगडे, लेफ्टनंट गजेंद्र अहिवळे, अशोक कोंढावळे आदी मान्यवर उपस्थित होते.