
मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे बँक ऑफ बडोदा पुरस्कृत सुरू झालेल्या बीओबी चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धेत फिडे गुणांकित सबज्युनियर बुद्धिबळपटू मानस हाथी, दीप फुणगे, स्वरूप बेलेमकर, श्लोक पवार, मैत्रेयी बेरा यांनी सलामीचे सामने जिंकले.
१३ वर्षाखालील वयोगटात प्रथम मानांकित मानस हाथीने आक्रमक चाली रचत आयुष्मान चक्रवर्तीच्या राजाला १९ व्या मिनिटाला नमविले. माजी नगरसेवक सुनील अहिर, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, फिडे बुद्धिबळ प्रशिक्षक राजाबाबू गजेंगी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले.
आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना सहकार्यीत बँक ऑफ बडोदा ट्रॉफी १३ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेत दुसऱ्या पटावर फिडे गुणांकित द्वितीय मानांकित दिवीत मोदी याला दीप फुणगेने चकविले. वजीर व हत्तीच्या सहाय्याने दीप फुणगेने प्रतिस्पर्ध्याच्या राजाला २४ व्या मिनिटाला शह देऊन सनसनाटी विजयाची नोंद केली. इतर सामन्यात फिडे गुणांकित स्वरूप बेलेमकरने ध्रुव यादवला, श्लोक पवारने जॉर्ज शेर्विनला , मैत्रेयी बेराने हुसैना राजला हरवून पहिला साखळी गुण वसूल केला. ७ वर्षाखालील गटात मेधांश बांगरने अभिष्ता चव्हाणचा, चैतन्या नगराळेने अनिश अगरवालचा पराभव केला. १० वर्षाखालील गटात अहान कातारुकाने मंश टंकचा, ईशी सिंगने मीरा शेट्टीचा पराभव करून साखळी एक गुण मिळवला.