
कोल्हापूर ः जयपूर (राजस्थान) येथे झालेल्या चौदा वर्षांखालील ऑल इंडिया रॅकिंग चॅम्पियनशिप सिरीज लॉन टेनिस स्पर्धेत कोल्हापूरच्या हर्षा गजानन देशपांडे हिने वैयक्तिक एकेरी गटात विजेतेपदाला गवसणी घातली.
या स्पर्धेतील मानांकित खेळाडू असल्यामुळे हर्षा देशपांडे हिला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. तर दुसऱ्या फेरीत तिने तेजस्वी यादव (राजस्थान) हिचा ६-२, ६-१ असा आणि उप-उपांत्य सामन्यात झिया ठक्कर (गुजरात) हिचा ६-२, ६-३ असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीचा सामना मात्र फारच उत्कंठावर्धक आणि अटीतटीचा झाला. स्पर्धेतील प्रथम मानांकित खुश्वी पडीयार (राजस्थान) हिने हर्षाला विजयासाठी बरेच झुंजवले पण हर्षाने संयम राखत, योग्य डावपेच रचून ६-०, ४-६, ७-५ अशा गुणांनी सामना स्वतःच्या बाजूने खेचून आणला आणि उपस्थितांची मने जिंकली.
उपांत्य फेरीतील विजयाने आत्मविश्वास वाढलेल्या हर्षा देशपांडे हिने अंतिम फेरीत नायसा सोलंकी (गुजरात) हिला ६-२, ६-१ असे सहज नमवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. आतापर्यंत हर्षाला अनेकवेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते पण यावेळी तिने महत्वाचा टप्पा ओलांडत स्वतःसाठी तिचे टेनिस एकेरीतील पहिले-वहिले विजेतेपद खेचून आणले आणि आपल्या पुढील यशस्वी वाटचालीची चुणूक दाखवली. हर्षा लगोलग हैद्राबाद, तेलंगणा येथे होणाऱ्या पुढील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी रवाना झाली आहे.
वय वर्षे १२ असणारी हर्षा ही कोल्हापूरमधील रंकाळा परिसरातील रहिवासी असून सध्या अहमदाबाद, गुजरात येथील अदानी स्पोर्ट्सलाईन टेनिस अकॅडमी, रिवरफ्रंट स्पोर्ट्स पार्क येथे मूळचे कोल्हापूरचेच असलेले राष्ट्रीय दर्जाचे कोच अर्शद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रशिक्षण घेत आहे.