
सीबीएसई साऊथ झोनमध्ये सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई
डेरवण ः श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या डेरवण क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शूटिंग रेंजमध्ये सराव करणाऱ्या आणि एसव्हीजेसिटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई साऊथ झोन चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत हर्ष बागवे याने १० मीटर एअर रायफल प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले. तसेच आरोह वारे, संस्कार शेडगे आणि हर्ष बागवे या त्रिकुटाने सांघिक १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक जिंकत नेमबाजी क्षेत्रात आपली छाप पाडली.
या यशामागे खेळाडूंच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांबरोबर नेमबाजीचे मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक सागर साळवी तसेच खेळाडूंच्या फिटनेससाठी विशेष मेहनत घेणारे कोचिंग डिव्हिजनचे अविनाश पवार, विनायक पवार आणि प्रतीक्षा पेंढारी यांचे मोलाचे योगदान आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल एसव्हीजेसीटीचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांनी सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करताना सांगितले की, “डेरवण क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा व दर्जेदार प्रशिक्षणामुळे आमच्या खेळाडूंनी एवढ्या अल्पावधीत राष्ट्रीय स्तरावर झळकण्याचा मान मिळवला आहे.”
या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा वर्तुळात आनंदाचे व कौतुकाचे वातावरण असून, नेमबाजी क्षेत्रात एसव्हीजेसिटीचे विद्यार्थी भविष्यात आणखी मोठी कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.