
छत्रपती संभाजीनगर ः नागपूर येथे महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय योनेक्स-सनराईज जी एच रायसोनी मेमोरियल महाराष्ट्र सब ज्युनिअर निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या सार्थक नलावडे, आणि नागपूरच्या दितीषा सोमकुवर यांनी रौप्यपदक जिंकले.
या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या सार्थक नलावडे आणि नागपूरच्या दितीषा सोमकुवार यांनी मिश्र दुहेरी अंडर १७ गटात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. सार्थक नलावडे याला हिमांशु गोडबोले, चेतन तायडे, भुवनेश्वर येथील दिलीप पंचायती आणि दिवेश कुमार यांचे प्रशिक्षण लाभले आहे. तर नागपूरच्या दितीषा सोमकुवर हिला जी बी वर्गीस यांचे प्रशिक्षण लाभले. राउंड ऑफ ३२ मध्ये प्रफुल पाठक आणि मनस्वी आगलावे यांचा १५-४, १५-३ असा पराभव करून, राउंड ऑफ १६ मध्ये अभिक शर्मा आणि सफा शेख यांना १५-८, १५-१३ असे पराभूत केले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत ईशान वानखेडे आणि जुई जाधव या नामांकित जोडीच्या अटीतटीच्या सामन्यात ११-२१, २१-१६, २१-१६ असा पराभव केला. आणि शेवटी उपांत्य फेरीत मोहित कांबळे आणि निधी पाडणेकर यांना २१-१०, २१-१६ असा सहज पराभव करून अंतिम फेरीत मजल मारली. या सामन्यात विजेत्या जोडीने २१-१७, २१-१२ अशा सरळ सेटमध्ये बाजी मारली.
सार्थक आणि दितीषा यांच्या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि छत्रपती संभाजीनगर बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष शिरीष बोराळकर तसेच महाराष्ट्र व छत्रपती संभाजीनगर बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव सिद्धार्थ पाटील, एसबीओए स्कूलच्या मुख्याध्यापिका शुभदा पुरंदरे, महेश भावसार, सदाशिव पाटील, क्रीडा अधिकारी संजीव बालय्या, ऋतुपर्ण कुलकर्णी, अमित सानप, गुरमीत सिंग, जावेद पठाण, निकेत वराडे, अतुल कुलकर्णी, परीक्षित पाटील, सदानंद महाजन, नरेश गुंडले, राजेश जाधव, योगेश जाधव, मनीष शर्मा, पवन लेंभे यांनी अभिनंदन केले आहे.