
सांगली ः महाराणी अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेच्या रेवनाळ हायस्कूल रेवनाळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. अहिल्यामातेच्या प्रतिमेची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
अहिल्यामातेच्या प्रतिमेचे पूजन रेवनाळ गावच्या लोकनियुक्त सरपंच सविताताई तोरवे व माजी सरपंच राजश्रीताई वाघमोडे यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य, समन्वय समितीचे अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीपराव वाघमोडे म्हणाले की, सर्वधर्मसमभाव, न्यायनिष्ठुर, निर्भीडपणा, दानशूरपणा, संवेदनशीलता हे अहिल्यामातेच्या जीवनाचे पैलू आजही सर्वांना प्रेरणादायक व मार्गदर्शक ठरत आहेत.
ज्येष्ठ शिक्षिका सुवर्णा वाघमोडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनकार्यावर आपले विचार व्यक्त केले. त्यावेळी वक्तृत्व स्पर्धा व गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यशस्वी मुला-मुलींना रेवनाळाच्या सरपंच सविताताई तोरवे, माजी सरपंच राजश्रीताई वाघमोडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष पांडुरंग वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य गणपती कटरे व सुरेश वाघमोडे यांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल होनमाने यांनी केले तर सुजाता अनुसे यांनी आभार मानले.