
आंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेचा शानदार समारोप, रमेश कुमार यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण
छत्रपती संभाजीनगर ः आंतर जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात ठाणे आणि महिला गटात नागपूर संघाने विजेतेपद पटकावले. छत्रपती संभाजीनगर महिला संघाने उपविजेतेपद संपादन केले. पुरुष गटात ग्रेटर मुंबई संघ उपविजेता ठरला.
विभागीय क्रीडा संकुलात आंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा संपन्न झाली. महिला गटाच्या अंतिम सामन्यात नागपूर महिला संघाने छत्रपती संभाजीनगर महिला संघाचा ३-१ असा पराभव करत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत शानदार कामगिरी बजावणाऱया संभाजीनगर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी, संस्कृती सातारकर व सोनाली मिरखेलकर या जोडीने शानदार खेळ करुन संभाजीनगर संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले. उपांत्य फेरीत छत्रपती संभाजीनगर संघाने पुणे संघाला २-० असे पराभूत केले. दुसरीकडे नागपूर महिला संघाने चुरशीच्या सामन्यात रायगड संघावर ३-२ असा विजय नोंदवला होता. पुरुष गटात ठाणे संघाने ग्रेटर मुंबई संघाला ३-० असे पराभूत करुन विजेतेपद पटकावले.
पारितोषिक वितरण सोहळा
आंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेतील विजेत्या संघाला भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे विभागीय आयुक्त रमेश कुमार यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे डेप्युटी प्रेसिडेंट आणि जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर व राज्य सचिव सिद्धार्थ पाटील, उद्योजक अमित सानप, हेमंत मिरखेलकर, आशीष वाजपेयी, मनोज कान्हेरे, अरुण गुदगे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष विरेन पाटील, कोषाध्यक्ष नितीन इंगोले, ऋतुपर्ण कुलकर्णी, मिलिंद देशमुख, अतुल कुलकर्णी, प्रशिक्षक हिमांशू गोडबोले, कृपा तेलंग, सचिन कुलकर्णी, सरफराज खान, चिरायू चौधरी, जावेद पठाण, सिद्धांत जाधव, विजय जाधव, सत्यबोध टाकसाळी, विजय भंडारे, परीक्षित पाटील, निकेत वराडे, निनाद कुलकर्णी, अर्णव बोरीकर, सदानंद महाजन आदी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगरचा उपविजेता संघ
सोनाली मिरखेलकर, संस्कृती सातारकर, वृषाली ताडमडगे, सारा साळुंके, आदिती पाटील, निरंजनी देशपांडे. प्रशिक्षक हिमांशू गोडबोले, संघ व्यवस्थापक अतुल कुलकर्णी.