
पुणे ः पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव अभिमन्यू सूर्यवंशी यांना “उद्धवश्री पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे उद्धवश्री पुरस्कार समितीच्या वतीने “उद्धवश्री पुरस्कार” सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते तसेच आमदार सचिन अहिर, उद्धवश्री पुरस्कार सोहळ्याचे मुख्य संयोजक माजी आमदार ॲड गौतम चाबुकस्वार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव व राष्ट्रीय पंच अभिमन्यू सूर्यवंशी यांना उद्धवश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव अभिमन्यू सूर्यवंशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बॉक्सिंग निवड समिती सदस्य म्हणून गेल्या ५ वर्षांपासून सलग कार्यरत आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बॉक्सिंग कोच म्हणून सलग १५ वर्षे उत्कृष्टपणे काम पाहिले आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक ८ वेळा “बेस्ट रेफरी” पुरस्कार, इतकेच नव्हे तर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुद्धा “बेस्ट रेफरी” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचा एनएसएनआयएस प्रमाणपत्र प्रशिक्षण पूर्ण केले असून महाराष्ट्र बॉक्सिंग संघाचे कोच म्हणून राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते, असे संयोजन सचिव अभिजीत गोफण यांनी याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या निदर्शनाला आणून दिले.
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे माजी महासचिव व उपाध्यक्ष भरतकुमार व्हावळ, पिंपरी चिंचवड बॉक्सिंग संघटनेचे सचिव व शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय यादव, मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे खजिनदार विनोद कुंजीर, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सदस्य आसिफ शेख, गोपाळ मोरे, दस्तगीर मणियार, हरिश नखाते, रवी गायकवाड, स्नेहल पवार, चेतना वारे, अनिकेत जामदार आदी मान्यवरांनी अभिमन्यू सूर्यवंशी यांना शुभेच्छा दिल्या.