
आशिया क्रॉस कंट्री रॅलीत टोयोटा संघाला दुसरा क्रमांक
पुणे ः पुण्याचा अनुभवी आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याला आशिया क्रॉस कंट्री रॅलीत तांत्रिक बिघाड झाल्यानंतर देखील जिगरबाज कामगिरी केल्याबद्दल खास करंडक देण्यात आला.
यंदाच्या वर्षाच्या प्रारंभी डकार रॅली यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या संजयने टोयोटा संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याचा संघ एकूण क्रमवारीत दुसरा आला. आशिया खंडातील डकार असे संबोधली जाणारी आठ दिवस कालावधी तसेच तीन हजार तीनशे किलोमीटर अंतराची रॅली नुकतीच थायलंडमधील पट्टायामध्ये पार पडली.
संजय म्हणाला की, क्रॉस कंट्री रॅली प्रकार अत्यंत लोकप्रिय आहे. वेगवेगळ्या ठिकाणी प्रेक्षकांची संख्या लक्षणीय होती. पारितोषिक वितरण समारंभाच्यावेळी शालेय मुलांनी माझ्या नावाचा जयघोष केला. त्यामुळे करंडक स्वीकारताना मी सुखावून गेलो होतो.
पहिल्या दिवशी इंजीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे १६० किलोमीटर अंतरावर संजयला पहिली फेरी पूर्ण करता आली नाही. यात त्याला एकूण १५ तासांची पेनल्टी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका वळणावर संजयच्या कारचे टायर फुटले. ते बदलण्यात तो आणि थायलंडचा नॅव्हीगेटर किराती नोईजार्द यांचा दोन तासांहून जास्त वेळ गेला. एका चाकाचा नट तुटल्यामुळे त्यांना जास्त वेळ लागला. परिणामी संजय दुसरी फेरी पूर्ण करू शकला नाही. त्याला एकूण नऊ तासांची पेनल्टी मिळाली. त्यानंतरही संजयने पुढील सहा दिवस रॅलीतील सहभाग कायम ठेवला. पुढील फेरीपासून अनुभवाच्यादृष्टिने तसेच फास्ट फॉरवर्ड स्पोर्ट संघाला साथ देण्यासाठी त्याने रॅली सुरू ठेवली. पाचव्या दिवशी संजयच्या टोयोटा संघातील सहकाऱ्यांची कार भरकटली. ती पुन्हा मार्गावर आणण्यासाठी संजयने मदत केली. त्यात त्याचा एक तास गेला. एकूण क्रमवारीत संजयला ३१वा क्रमांक मिळाला.
संजयने २०११ मध्ये आशिया क्रॉस कंट्री रॅलीचे विजेते मिळविले होते. टी१डी गटात त्याने सर्वोत्तम कामगिरी केली होती. ५७ वर्षांच्या संजयने ४८ रॅलींमध्ये ४२ करंडक मिळविले आहेत. युरोप, आशिया येथील विविध रॅलींमध्ये त्याने भाग घेतला आहे. २०१२ मध्ये त्याने आशिया-पॅसिफीक रॅली मालिकेत (एपीआरसी) विजेतेपद मिळविले होते. याशिवाय त्याने फिनलंडमधील जगप्रसिद्ध जागतिक रॅलीही पूर्ण केली आहे.